बार्शी – विजयादशमी अर्थात दसरा सण बार्शी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, कसब्यातील पाटलांची तुकाई देवी, एकविरा आई मंदिर, खडकावरची जगदंबा देवी मंदिर, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळासह विविध देवी मंदिरांत सीमोल्लंघनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
विजयादशमीनिमित्त सायंकाळच्या सुमारास नागरिकांनी नवीन कपडे परिधान करून मंदिरांमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले. परंपरेनुसार सीमोल्लंघनाची पूजा करून देवीसमोर नतमस्तक होत सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. शहरातील मानाच्या पालख्यांनी संबळ आणि हलगीच्या निनादात, ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष करीत वाजतगाजत सीमोल्लंघनासाठी मार्गक्रमण केले. या वेळी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
विजयादशमीच्या मुहूर्तावर अनेक नागरिकांनी आपल्या शस्त्रांचे विधिवत पूजन केले. शहरातील मानाच्या पालख्यांसोबत शस्त्रांची मिरवणूकही काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर, देवीचा जयघोष आणि भाविकांचा उत्साह यामुळे दसऱ्याच्या सोहळ्याला विशेष रंगत आली.
दसऱ्यानिमित्त नागरिकांनी एकमेकांना आपट्याची पाने अर्थात ‘सोने’ देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली. महिलांनी घरातील पुरुष मंडळींना ओवाळून सणाचा आनंद द्विगुणित केला. बंधुभाव, सामाजिक ऐक्य आणि समृद्धीचा संदेश देणाऱ्या या उत्सवात सर्व समाजघटक सहभागी झाले होते. परंपरा आणि संस्कृतीचे जतन करीत बार्शीकरांनी विजयादशमीचा आनंदोत्सव उत्साहात साजरा केला.
Post Views: 5