पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री (१० किलोमीटर धावणे) स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने रौप्यपदक मिळविले, तर महाविद्यालयाची खेळाडू सानिका ऐवळे हिने सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या गटात सुमित माने याने कांस्यपदक मिळवून महाविद्यालयाच्या यशात भर घातली.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सानिका ऐवळे आणि सुमित माने या दोन्ही खेळाडूंची मेंगलोर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यापीठस्तरीय स्पर्धेत यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, जिमखाना समितीचे सदस्य आणि क्रीडा विभागातील प्राध्यापकांनी खेळाडूंचे कौतुक केले.
खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयातील जिमखाना विभागाचे प्रमुख व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, प्रा. उमेश साळुंखे,कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. विठ्ठल फुले व प्रा. मनोज खपाले तसेच जिमखाना समितीचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयातील खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून, राष्ट्रीय स्पर्धेतही हे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views: 6