सोलापूर – कोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवजात शिशू कक्षात विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागल्याच्या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने दुरुस्तीची कार्यवाही केली आहे. विद्युत यंत्रणेतील बिघाड दूर करून नवजात शिशू कक्ष पूर्ववत सुरू करण्यात आला असून, आरोग्य केंद्रातील आवश्यक सोयी-सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी दिली.
कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवजात शिशू कक्षात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच दूरध्वनीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोपुरवाड यांच्याशी चर्चा करून विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करण्याची आणि रुग्णांच्या सेवेसाठी संबंधित विभाग लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली.
यानंतर सोमवारी दुपारी डॉ. कोपुरवाड यांनी कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन घटनेची पाहणी केली. विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट करत त्यांनी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर नवजात शिशू कक्ष पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय आरोग्य केंद्रातील आवश्यक सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
( टीप मेल वरील फोटो लावणे)
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांमधील विद्युत यंत्रणा, इमारतींची सुरक्षितता आणि आपत्कालीन व्यवस्थेच्या नियमित तपासणीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. विशेषतः नवजात बालकांसारख्या संवेदनशील रुग्णांना सेवा देणाऱ्या कक्षांमध्ये सुरक्षिततेच्या उपाय योजनांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे. यावेळी कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कांबळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
शासकीय आरोग्य इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
दरम्यान, जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील रुग्णोपयोगी सुविधा व सुरक्षाव्यवस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने यांनी केली आहे. कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आवश्यक दुरुस्ती आणि सुविधांसाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
Post Views: 25