सोलापूर : जिद्द, चपळाई, सांघिक समन्वय आणि दमदार खेळाच्या जोरावर सातरस्ता मोदीखाना येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने शालेय शहर स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. या विजयासह महाविद्यालयाच्या संघाने सांगोला येथे होणाऱ्या पुणे विभागीय कबड्डी स्पर्धेत प्रवेश मिळविला असून, विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीचा अंतिम सामना राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे पार पडला. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर विजेतेपदावर आपले नाव कोरले.
विजेत्या संघाचे नेतृत्व मेघना घोडमिसे हिने केले. या संघात ऐश्वर्या कांबळे, कावेरी मधर्ले, गायत्री बेलदवरु, महिमा जगले, अपूर्वा गायकवाड, पूर्वा पवार, श्रिया गायकवाड, दीपाली होनमाने, इंद्रायणी वाघमोडे, साक्षी देवकते आणि धनश्री चव्हाण यांचा समावेश होता.
या संघाला प्रशिक्षक प्रा. शरणबसवेश्वर वांगी आणि प्रा. अमर पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी अभिनंदन केले. तसेच सांगोला येथे होणाऱ्या पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
——
Post Views: 13