सोलापूर – विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या शिक्षण विभागाने आता शिक्षकांच्या हजेरीलाही डिजिटल शिस्तीची चौकट घातली आहे. शाळेत वेळेवर पोहोचणे, निर्धारित वेळेत हजेरी नोंदवणे आणि शाळा सुटताना पुन्हा उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘स्विफ्टचॅट’ मोबाइल अॅपमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ चॅटबॉटद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, निर्धारित वेळेनंतर हजेरी नोंदविल्यास संबंधित शिक्षकाला ऑनलाइन ‘लेट मार्क’ लागणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे २२ हजार ५०० शिक्षकांच्या दैनंदिन उपस्थितीची डिजिटल नोंद ठेवली जाणार आहे.
शिक्षकांच्या उपस्थितीत नियमितता आणणे, शाळांमधील कामकाजात पारदर्शकता वाढवणे आणि हजेरी नोंदविण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणणे, हा या प्रणालीमागील उद्देश आहे. यापूर्वी अनेक शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती पारंपरिक हजेरीपटावर नोंदवली जात होती. आता डिजिटल नोंदीमुळे शिक्षकांच्या शाळेत येण्याच्या आणि शाळा सुटल्यानंतर बाहेर पडण्याच्या वेळेची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उपस्थितीच्या नोंदींची पडताळणी करणेही शिक्षण विभागाला शक्य होणार आहे.
शाळांच्या सत्रांनुसार उपस्थिती नोंदविण्याची वेळ निश्चित केली जाणार आहे. सकाळच्या आणि दुपारच्या सत्रातील शाळांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने, शाळा सुरू होण्याच्या साधारण १० ते १५ मिनिटे आधी अॅपमध्ये हजेरी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होईल. निर्धारित वेळेत उपस्थिती नोंदविणे आवश्यक राहणार असून, वेळेनंतर नोंद केल्यास प्रणालीत ‘लेट मार्क’ दर्शविला जाईल. शाळा सुटल्यानंतर निघतानाही उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.
यामुळे केवळ शिक्षक शाळेत आले की नाही, एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता, त्यांच्या उपस्थितीच्या वेळेचीही नोंद ठेवली जाणार आहे. राज्यस्तरावर संकलित होणाऱ्या या माहितीच्या आधारे शिक्षकांच्या उपस्थितीचे निरीक्षण करणे अधिक सुलभ होईल.
जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षकांना ही प्रणाली लागू राहणार आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी यांसह सर्व माध्यमांच्या शाळांचा तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराचा यात समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ९ हजार ५०० शिक्षकांसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अंदाजे १३ हजार शिक्षकांना या प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या दैनंदिन उपस्थितीच्या नोंदींसाठी डिजिटल प्रणालीचा वापर व्यापक स्तरावर होणार आहे.
डिजिटल हजेरीमुळे शिक्षकांच्या उपस्थितीच्या नोंदी अधिक सुसंगत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, शाळांच्या सत्रांनुसार वेळेचे नियोजन, अॅपचा नियमित वापर आणि तांत्रिक अडचणींचे निराकरण या बाबींची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.
कोट
शिक्षणाधिकाऱ्यांकडून अंमलबजावणीच्या सूचना
शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करून सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांनी ‘स्मार्ट उपस्थिती’ चॅटबॉटचा वापर वेळेत सुरू करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी दिली.