पंढरपूर – शालेय स्पर्धेतील 14 व 17 वर्षाखालील गटाचा शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षणाचा शासन निर्णय पूर्ववत सुरु करावा, यासाठी क्रीडामंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे पाठपुरावा करून शासन निर्णय काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस लतीफभाई तांबोळी यांनी सांगितले
वाडीकुरोली येथे पुणे विभागीय शालेय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी आपल्या भाषणात खेळाडू आरक्षणाचा हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले. तांबोळी म्हणाले, खेळातील मूळ पाया असलेले या दोन्ही वयोगटातील उद्ययोन्मुख खेळाडूंना शासनाने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विशेषता मुली या दोन गटातच जास्त संख्येने असतात. हा गट या शासन निर्णयातून वगळल्यानंतर प्रामुख्याने मुली व त्यांचे पालक या खेळाकडे पाठ फिरवतील.
या स्पर्धेत सोलापूर, अहिल्यानगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शहरी व ग्रामीण विभागांचे १४ संघ सहभागी झाले आहेत. क्रीडा उपसंचालक युवराज नाईक आणि श्री. तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, संस्थेचे संचालक कांतीलाल काळे, तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, शोभा पालवे, स्पर्धाप्रमुख रफिक शेख, निवड समिती सदस्य सत्येन जाधव, संजय बोडरे, सोमनाथ बनसोडे, मिलिंद कुरपे, सोलापूर खो-खो असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, उपाध्यक्ष अजितकुमार संगवे, पंचमंडळ सचिव मोहन रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीप लिंगे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्राचार्य संजय कुलकर्णी यांनी मानले.
——चौकट आवश्यक —–
वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली अंतिम
फेरीत
17 वर्षाखालील मुलींच्या गटात वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली व श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय पिंपरी चिंचवड तर मुलांच्या गटात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मुलांचे विद्यालय पुणे व सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहिल्यानगर यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
——-
राष्ट्रीय खेळाडूंचा विशेष सन्मान
स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या भारतीय खो-खो संघाच्या कर्णधार व राष्ट्रीय खेळाडू प्रियंका इंगळे, अल्टिमेट खो-खो लीगमधील स्टार खेळाडू रामजी कश्यप, जानकी पुरस्कारप्राप्त प्रशालेची माजी विद्यार्थिनी प्रीती काळे, तसेच संध्या सुरवसे आणि रूपाली खडके यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या मान्यवर खेळाडूंच्या उपस्थितीमुळे सहभागी खेळाडूंना प्रेरणा मिळाली.
——
आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करा
क्रीडा उपसंचालक युवराज नाईक म्हणाले, “खेळाडूंनी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवून मनामध्ये जिंकण्याची भावना निर्माण केली पाहिजे. आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मैदानातील विजयाचे ध्येय साध्य करता येते. ग्रामीण भागातील खेळाडूंनी उज्ज्वल यश संपादन करावे. खेळाडूंच्या प्रगतीसाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील,”
——-



















