सोलापूर – सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील कोळी समाज बांधवांनी एक महत्त्वपूर्ण आणि सामाजिक भान जपणारा निर्णय घेतला आहे. उद्योजक गणेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव २०२६ मोठ्या डामडौलात न साजरा करता अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
यावर्षी उपक्रम म्हणून गणेश कोळी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले. सात रस्ता येथे महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
उद्योजक गणेश कोळी आणि कपिल कोळी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, राज्यात शेतकरी आणि सामान्य नागरिक दुष्काळामुळे अडचणीत असताना उत्सवावर मोठा खर्च करणे योग्य नाही. त्याऐवजी तोच निधी समाजातील गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला तर महर्षी वाल्मिकी यांना खरी आदरांजली ठरेल.
समाजातील विद्यार्थी हेच भविष्य असून त्यांना शैक्षणिक साहित्य, फी साठी मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी गणेश कोळी, संजय कुमार कोळी, कपिल कोळी, भारती कोळी, सुधाकर सुसलादी, नागेश कोळी, दत्ता कलाडगी, अप्पू शेडगुळ, देविदास वाघमारे, शांतप्पा कोळी, मनोज कामनुरकर, सुनील प्रचंडे, शिवा कोळी आदी उपस्थित होते.





















