सोलापूर – शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटले, तरी राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या कृतिपत्रिका अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. दिवाळीची सुट्टी जवळ आली असताना सरावासाठी पूरक साहित्यच मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुट्टीतील अभ्यासाचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न शिक्षक आणि पालकांसमोर निर्माण झाला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांचा अभ्यास सुरू असताना कृतिपत्रिकांच्या वितरणाला झालेला विलंब विद्यार्थ्यांच्या सरावावर परिणाम करणारा ठरत आहे.
विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात अभ्यासाची उजळणी करता यावी, तसेच वर्गात शिकविलेल्या घटकांचा सराव करता यावा, यासाठी कृतिपत्रिका महत्त्वाच्या ठरतात. मात्र, शैक्षणिक वर्षाचा महत्त्वाचा कालावधी उलटूनही त्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साधनांचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीपूर्वी कृतिपत्रिका मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात गेल्या वर्षी इयत्ता पहिलीसाठी, तर यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली आहेत. अभ्यासक्रमातील बदल लक्षात घेता, विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांमधील घटक शिकविणे पुरेसे नसून त्यांचे आकलन तपासण्यासाठी आणि नियमित सरावासाठी पूरक साहित्य उपलब्ध होणेही आवश्यक आहे. कृतिपत्रिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविणे, निरीक्षण करणे, विचार करणे आणि शिकलेल्या संकल्पना प्रत्यक्ष वापरण्याची संधी मिळते.
चौकट
कृतिपत्रिका म्हणजे काय?
पाठ्यपुस्तकातील घटक समजून घेण्यासाठी, शिकलेल्या ज्ञानाची उजळणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे आकलन तपासण्यासाठी प्रश्न, कृती व विविध सरावांचा समावेश असलेल्या साहित्याला कृतिपत्रिका म्हणतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वाध्यायाची सवय लागते, चुका ओळखता येतात आणि अभ्यासातील अडचणी दूर करण्यास मदत होते. त्यामुळे शाळेतील अध्यापनासोबतच घरच्या घरी अभ्यासासाठीही कृतिपत्रिका उपयुक्त ठरतात.
चौकट
वेळेत उपलब्धतेसाठी शिक्षण विभागाने लक्ष द्यावे
कृतिपत्रिका तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (एससीईआरटी) आहे. मात्र, यंदा त्या उपलब्ध होण्यास विलंब का झाला, तसेच विद्यार्थ्यांना त्या कधी मिळणार, याबाबत स्पष्टता नाही. यासंदर्भात एससीईआरटीचे संचालक मंगेश जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
कोट
पाठ्यपुस्तकांसोबत कृतिपत्रिका महत्वाचे
दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना अभ्यासाची उजळणी करता यावी, यासाठी एससीईआरटीने कृतिपत्रिका तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. शालेय शिक्षण विभागाने यासाठी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी. पाठ्यपुस्तकांसोबत कृतिपत्रिका किंवा सराव पुस्तिका वेळेत आणि मोफत मिळाल्यास विद्यार्थ्यांचे आकलन व मूल्यमापन अधिक प्रभावी होऊ शकते,” अशी मागणी डी.एड.-बी.एड. असोसिएशनच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती विभागाचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी केली.