अक्कलकोट – कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी परिवाराच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला असून, खेडगी परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.
कोजागरी पौर्णिमा हा भाविकांसाठी विशेष श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. या उत्सवानिमित्त अनेक कुटुंबांतील नागरिक, महिला, लहान मुले आणि तरुण मोठ्या भक्तिभावाने तुळजापूर येथे दर्शनासाठी जातात. मात्र, प्रवासाचा खर्च किंवा वाहनांची सोय उपलब्ध आणि वेळेवर नसल्यामुळे काही भाविकांना दर्शनासाठी जाणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन खेडगी परिवाराने भाविकांसाठी मोफत बससेवेचा उपक्रम सुरू केला.
कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रविवारी रात्री खेडगी परिवाराच्या वतीने चार बसगाड्यांचे पूजन करून त्यांना तुळजापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. या बसमधून भाविकांना तुळजापूर येथे नेण्यात आले. त्यामुळे अनेक भाविकांना कोणताही प्रवासखर्च न करता तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. विशेषतः आर्थिक परिस्थिती सामान्य असलेल्या भाविकांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरला.
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन शिवशरण खेडगी यांनी सुरू केलेली ही सेवा विद्यमान चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी गेल्या २० वर्षांपासून आजही कायम ठेवली आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यातून समाजाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याची खेडगी परिवाराची परंपरा या उपक्रमातून अधोरेखित झाली. या समाजाभिमुख उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी बसवराज गोरे, नागेश कोनापूरे, कालिदास कोळी, श्रीनिवास कोळी, शिवानंद स्वामी, दिनेश धाराशिवकर, प्रा. शिवशरण कलशेट्टी यांच्यासह बसलिंगप्पा खेडगी मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि शेकडो भाविक उपस्थित होते.
चौकट —
*भाविकांच्या सेवेतून सामाजिक बांधिलकी*
धार्मिक श्रद्धेला सामाजिक सेवेची जोड देत खेडगी परिवाराने राबविलेला मोफत बससेवेचा उपक्रम भाविकांसाठी उपयुक्त ठरला. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजातील गरजू नागरिकांना मदत मिळण्याबरोबरच सामाजिक एकोपा आणि सेवाभावाची परंपराही अधिक बळकट होत आहे.