बार्शी – शहरातील शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशालेमधील शिक्षकांचा इन्कमटॅक्स, टीडीएस, टीसीएस असा कर भरणा करण्यासाठी मुख्याध्यापकाने कर सल्लागाराकडे आयकर विभागासाठी दिलेली १३ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा अपहार झाला असून शिक्षकांची फसवणूक झाल्याप्रकरणी कर सल्लागारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.पी. बागडे यांनी दिलेल आहेत.
संदीप वायचळ शेठ अगरचंद कुंकूलीळ प्रशालेचे कर सल्लागार म्हणून काम पहात होते. तत्कालिन मुख्याध्यापक विजयकुमार गुलमिरे होते. गुळमिरे यांनी प्रशालेतील शिक्षकांचा इन्कम टॅक्स, टीडीएस, टीसीएस अशी मार्च २०२२-२३ ची रक्कम १३ लाख ६७ हजार ५०० रुपये वायचळ यास आयकर विभागाकडे भरण्यासाठी धनादेशाद्वारे सुपूर्द केली.
वायचळ याने सदरची रक्कम कर विभागाला भरली नाही आयकर विभागाची मार्च २३ मध्ये २४ लाख ०५ हजार ६१५ रुपये थकबाकी असलेबाबत नोटीस आली. यावेळी मुख्याध्यापक गुळमिरे यांनी वायचळ याचेकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली.
याबाबत प्रशालेने दुसन्या कर सल्लागाराकडे चौकशी केली असता वायचळने कर भरणा केलेल्या पावत्या आहेत त्या बनावट असून भरणा केला नसल्याचे सांगितले त्यावेळी शिक्षकांच्या रकमेचा अपहार होऊन आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
दंड, व्याज, उशिरा भरणा करण्यामुळे सर्व शिक्षकांना भुर्दंड सहन करावा लागणार असून यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांचेकडे वायचळ याचेविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रारी अर्ज दाखल केला पण पोलिसांनी याची दखल घेतली नाही अखेर न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.