सोलापूर – जिल्ह्यातील २५० अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे शैक्षणिक व अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आले; मात्र जलपुनर्भरणाचे काम अपूर्ण राहिल्याने या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंगणवाड्यांमध्ये स्मार्ट एलईडी टीव्ही, डिजिटल अभ्यासक्रम, स्वच्छता साहित्य आणि स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू पोहोचल्या असल्या, तरी त्यांचा अपेक्षित वापर होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे साहित्य उपलब्ध असूनही बालकांना स्मार्ट शिक्षणाचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २५० अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मे ते जुलैदरम्यान संबंधित अंगणवाड्यांना विविध साहित्याचा पुरवठा करण्यात आला. काही साहित्य बसविण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली.
मात्र, निविदेतील अटींनुसार पुरवठादाराने करावयाचे जलपुनर्भरणाचे काम अपूर्ण राहिल्याने संपूर्ण उपक्रमाच्या उपयोगितेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, साहित्याचा पुरवठा आणि प्रत्यक्ष वापर यातील दरी दूर करून जलपुनर्भरणाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा स्मार्ट अंगणवाडीचा उद्देश कागदावरच राहण्याची शक्यता आहे.
चौकट
टीव्हीपासून स्वयंपाकघरापर्यंत साहित्य
स्मार्ट अंगणवाडी उपक्रमांतर्गत ४३ इंची स्मार्ट एलईडी टीव्ही, डिजिटल अभ्यासक्रम असलेला पेनड्राइव्ह, शैक्षणिक भित्तिचित्रे, सतरंजी तसेच भिंती व छताच्या रंगकामाचा समावेश आहे. स्वच्छतेसाठी लिक्विड साबण, स्वच्छता पावडर, स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या, विजेविना चालणारे जलशुद्धीकरण यंत्र आणि हात धुण्यासाठी बेसिन देण्यात आले आहे.याशिवाय दोन बर्नरची गॅस शेगडी, सात लिटरचा प्रेशर कुकर, धान्य साठवणुकीचे डबे, स्टीलच्या ताटल्या, ग्लास, चमचे, पाण्याची टाकी, हंडा, वगराळे, मसाल्यांचे डबे, भांडी ठेवण्याचे रॅक आणि कचरापेटी असे साहित्यही पुरविण्यात आले आहे.
कोट
नोटीस बजावली, महिनाभरात वापराच्या सूचना
निविदेतील अटींची पूर्तता न झाल्याने संबंधित पुरवठादाराला नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या महिनाभरात साहित्य पुरविण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये टीव्हीसह सर्व साहित्य वापरण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
Post Views: 30