सोलापूर : कुमठा नाका परिसरातील तक्षशील नगर येथे प्रभाग क्रमांक १८ मधील राखीव जागेवरील अतिक्रमण हटवून ती जागा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अभ्यास केंद्रासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बुजुर्ग समिती आणि स्थानिक महिला व नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदन देण्यात आले आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी संबंधित जागेवरील साहित्य तातडीने हटविण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी स्थानिक महिला व नागरिकांनी सोमवारी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. तक्षशील नगर येथे गेल्या ३० ते ४० वर्षांपासून बुजुर्ग समितीच्या नावे राखीव जागा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या जागेचा उपयोग गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, काही व्यक्तींनी या जागेवर अनधिकृतपणे पत्र्याचे शेड उभारून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनात केला आहे. संबंधित जागेच्या कागदपत्रांची प्रशासकीय स्तरावर शहानिशा करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणीही केली आहे.
दरम्यान, ही जागा सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीची खुली जागा असून, सर्वसाधारण सभेत धोरण निश्चित झाल्यानंतर तिचा विकास करण्यात येईल. या जागेवर ठेवलेले साहित्य तातडीने काढून घेण्याचे निर्देश देतानाच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे, असे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी संबंधितांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. आता महापालिका प्रशासन अतिक्रमण हटविण्याबाबत कोणती ठोस कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 26