सोलापूर – बालकांमधील रक्तक्षय, अशक्तपणा आणि जंतसंसर्गामुळे होणारे दुष्परिणाम रोखून त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ सुधारण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील एक ते १९ वर्षे वयोगटातील तब्बल नऊ लाख ८३ हजार ७०६ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेचा लाभ प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोहोचविण्यासाठी पालकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
यावेळी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत आयवळे, आयुष्मान आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे, जिल्हा परिषद शाळा कोंडीचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली. शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य संस्थांच्या माध्यमातून बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, रक्तक्षय व अशक्तपणाचे प्रमाण कमी करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
चौकट
कोंडी येथे मोहिमेचा शुभारंभ
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट देऊन मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा, कोंडी येथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या हस्ते जंतनाशक गोळ्या देऊन मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जंतमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. जंतसंसर्गामुळे बालकांच्या शरीरातील पोषणावर परिणाम होऊ शकतो. परिणामी रक्तक्षय, थकवा आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याबरोबरच पालकांनी त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. शाळा आणि अंगणवाडी स्तरावर राबविण्यात येणाऱ्या अशा मोहिमांमध्ये पालकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.
चौकट
गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबरला संधी
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन म्हणाले, जंतसंसर्गाचा बालकांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील एकही पात्र बालक जंतनाशक मोहिमेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत. मोहिमेच्या दिवशी ज्या बालकांना जंतनाशक गोळी घेता आली नाही, अशा बालकांना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या मॉप-अप राऊंडमध्ये गोळी देण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याला या मोहिमेचा लाभ मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
Post Views: 20