पंढरपूर – यंदा पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून अनेक भागात विकतचे पाणी आणण्याची वेळ आली आहे. पंढरपूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर तसेच चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या गोपाळपूर गावाला तर पाच दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. हाकेच्या अंतरावर नदी असूनही अशी वेळ आल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान अशा दुष्काळी परिस्थिती देखील सोलापूर जिल्ह्यात तुलनेने पंढरपूर तालुक्याला पाणी टंचाईचा सामना कमी करावा लागत आहे. येथील शंभरपैकी ४५ गावांमधून चंद्रभागा नदी वाहत आहे. यामुळे धरणातून पाणी सोडल्यानंतर किमान गावाच्या बाहेर पाणी तरी वाहते. गोपाळपूर हे पंढरपूर शहरापासून दोन किमी अंतरावर असून उंच टेकडीवर आहे. शहराच्या पायथ्याशी चंद्रभागा नदी असून मंदिराच्या जवळून प्राचीन पुष्पावती नदी जाते. सध्या पुष्पावती वाहत नसून गावाच्या पायथ्याशी चंद्रभागा नदी आहे. विशेष म्हणजे चंद्रभागा नदीवर येथे विष्णुपद बंधारा देखील आहे. यामुळे जवळपास वर्षभर येथे चंद्रभागा नदीला पाणी असते.
मात्र असे असून देखील गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळपूर येथे पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. सध्या तर दुष्काळामुळे पाच दिवसांपासून गोपाळपूरला पिण्याचे पाणीच सोडण्यात आले नाही. पाच दिवसानंतर खासगी विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात आला. पण हे पाणी पिण्यास योग्य आहे का ? असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित होत आहे. चंद्रभागा नदीकाठावर असून देखील गोपाळपूर येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने गोपाळपूर ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Post Views: 11