सोलापूर : ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत तेलंगणाचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक डीजीपी महेश भागवत यांनी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करत पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान ड्रीम फाउंडेशनच्या कार्याची अहवाल पत्रिका महेश भागवत यांनी पाहिली. राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र, अस्सल सोलापुरी हुरडा पार्टी, श्री सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र, ड्रीम युवा बिझनेस फोरम, सेंद्रिय भाजीपाला उत्पादन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि युवा कौशल्य विकास मार्गदर्शन अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी फाउंडेशनच्या वतीने महेश भागवत यांचा अस्सल सोलापुरी भाकरी आणि शेंगा चटणी देऊन सन्मान करण्यात आला. सोलापूरची खाद्यसंस्कृती आणि हुरड्याची खासियत हैदराबादमधील मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या हुरडा पार्टीसाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त देशातील १०० शहरांमध्ये साहित्य संमेलने आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प ड्रीम फाउंडेशनने व्यक्त केला. या उपक्रमासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची तयारी महेश भागवत यांनी दर्शविल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
सामाजिक कार्य, युवा विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांच्या माध्यमातून मराठी व तेलुगू समाजातील स्नेहबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार या भेटीत व्यक्त करण्यात आला.
——-
Post Views: 168