धाराशिव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील मतदार यादीतील फेरबदल व कथित अनियमिततेच्या निषेधार्थ धाराशिव तहसील कार्यालयासमोर धाराशिव शहर काँग्रेस कमिटी व धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण भारतभरामध्ये मत वाचवा देश वाचवा अंतर्गत अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे.
यावेळी आंदोलकांनी ‘मत वाचवा, देश वाचवा’, ‘वोट चोर, गद्दी चोर’ अशा घोषणा देत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षणाची मागणी केली. घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला.
आंदोलनानंतर धाराशिव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील मतदार यादीतील फेरबदल व कथित अनियमिततेची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेचा मूलभूत आधार असून पात्र मतदाराचे नाव वगळले जाणे, अपात्र व्यक्तीचे नाव समाविष्ट होणे किंवा मतदार यादीत अनियमित फेरबदल होणे यामुळे नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मतदार यादीशी संबंधित सर्व तक्रारींची वस्तुनिष्ठ व निष्पक्ष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
तसेच चौकशी निष्पक्षपणे पूर्ण होईपर्यंत श्री. ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्याबाबत सक्षम प्राधिकरणाने आवश्यक ती कार्यवाही करावी, मतदार यादीतील नावे वगळणे व नवीन नावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेची पारदर्शकपणे पडताळणी करावी आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित राहील याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
मतदार यादीशी संबंधित तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, प्रशांत पाटील, विनोद वीर, धनंजय राऊत, शीला उंबरे, खलील सय्यद, अजित शेळके, अग्निवेश शिंदे, महबूब पटेल, अजहर पठाण, शिवाजी गायकवाड, सरफराज काजी, चंद्रकांत जाधव, आयुब पठाण, आरिफ मुलानी, संजय गजधने, संकेत पडवळ, सय्यद मन्सूर, कृपाल सिंह ठाकुर, अभिषेक बागल,धवलसिंह लावंड, अविनाश रणखांब, दिगंबर गायकवाड, राजुदास आडे, बाबा मोमीन, प्रेमानंद सपकाळ, पोपट शिंदे, हरिदास शिंदे, इमाम पटेल, ज्योतीराम निमसे, अभिमान पेटे,सलमान शेख, विजय मुद्दे, देवानंद एडके, बापू खटके, मौलाना शौकत, बालाजी राठोड, कानिफनाथ देवकुळे, शैलेश दाने यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदाराचा अधिकार सुरक्षित राहणे आवश्यक आहे, असा निर्धार यावेळी काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
















