बार्शी – बार्शी शहरातील एका प्लॉटिंग परिसरात सुरू असलेल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून तिच्या दीराविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार नुसार, पिडीत महिला यांचे बार्शी शहरातील एका प्लॉटिंग परिसरात घराचे बांधकाम सुरू आहे. दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या आई व बहीण यांच्यासोबत बांधकामाच्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी आणि बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या. आई व बहीण बांधकाम सुरू असलेल्या खोलीत कपडे धूत असताना पीडित महिला या बाहेर पाणी मारत होत्या. त्या पाणी मारत असताना त्यांचे दीर यांनी पाठीमागून येऊन मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले. या प्रकारामुळे त्यांनी आरडाओरड केली, आवाज ऐकून आई व बहीण बाहेर आल्या. त्यावेळी बहिण जवळ येताच दिराने तिला धक्का देऊन घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या झटापटीत आपल्या डाव्या हाताला खरचटले असून गळ्यातील मणी-मंगळसूत्र तुटून पडल्याचेही पिडीत महिला यांनी फिर्यादीत म्हटले आहे.घटनेनंतर पीडित महिला यांनी आई, बहीण आणि पती यांच्यासह बार्शी शहर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Post Views: 170