औराद शहाजनी – येथे महर्षि वाल्मीकी ऋषी यांची जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. आदिकवी महर्षि वाल्मीकी यांनी रामायणासारखा महान ग्रंथ लिहून संपूर्ण मानवजातीला सत्य, आदर्श आणि कर्तव्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या जयंतीनिमित्त येथील वाल्मीकी समाज बांधवांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी महर्षि वाल्मीकी ऋषी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीराम, हनुमान आणि महर्षि वाल्मीकी यांच्या भव्य प्रतिमा असलेला फलक उभारण्यात आला होता. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिलांनी रांगोळी काढून परिसर सुशोभित केला होता.
यावेळी जयंतीचे औचित्य साधून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल येचे, महेश येचे, राजाराम येचे, अमर घंटे, तुकाराम घंटे, सुनील येचे, संभाजी येचे, हरी येचे, राजू येचे, मंजुनाथ येचे या समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, वाल्मीक ऋषी हे दरोडेखोर रत्नाकर यांच्यापासून तपश्चर्येने महर्षि बनले. त्यांनी घालून दिलेला आदर्श आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. तरुणांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांनी महर्षि वाल्मीकी यांचा जयजयकार करत कार्यक्रमाची सांगता केली.
Post Views: 171