पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय, पंढरपूर येथे भारतीय ज्ञान परंपरा व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्होकल फॉर लोकल’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप उत्साहात झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ लघुउद्योजक जितेंद्र बाजारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी IQAC समन्वयक डॉ. अमर कांबळे होते.
कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. कर्मवीर भाऊराव पाटील व रयतमाऊली लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपप्राचार्य डॉ. राजेश कवडे, पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट कॉलेज, सातारा येथील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. मोहन भोसले, ग्रंथपाल डॉ. विनया पाटील, डॉ. नागिन सर्वगोड, डॉ. दादासाहेब हाके आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयातील २४ विभागांतील विद्यार्थ्यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेअंतर्गत बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांच्या पारंपरिक व्यवसायांवर आधारित मॉडेल्स व माहितीपट सादर केले. मॉडेल्सचे परीक्षण डॉ. नागिन सर्वगोड व डॉ. विनया पाटील यांनी, तर माहितीपटांचे परीक्षण डॉ. मोहन भोसले व डॉ. दादासाहेब हाके यांनी केले. विद्यार्थ्यांनी संशोधन, कल्पकता, चिकाटी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या प्रतिकृती व माहितीपटांचे मान्यवरांनी कौतुक केले.
प्रमुख पाहुणे जितेंद्र बाजारे मार्गदर्शन करताना म्हणाले, “विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील गरजा, स्थानिक संसाधने आणि पारंपरिक जीवनपद्धती यांचा विचार करून उद्योगांची निर्मिती केली पाहिजे. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळविण्यासाठी न करता उद्योजक होण्यासाठीही केला पाहिजे.” ग्रामीण भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून रोजगाराच्या संधी निर्माण करता येतात. दूध, तूप आणि गोमूत्र यांसारख्या देशी गायींपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर आधारित व्यवसायांना बाजारपेठेत संधी आहे. विद्यार्थ्यांनी आव्हानांकडे संधी म्हणून पाहून आपल्या कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले. पंढरपूर शहरातील धुळीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठीही विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना मांडाव्यात, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. अमर कांबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सक्षम करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये उद्योजकीय कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संशोधनाची आवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पारंपरिक ज्ञान यांची सांगड घालून रोजगारनिर्मिती करावी. केवळ रोजगार शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी विकसित करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता उपल्ली व प्रा. साधना कटकमवार यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. धनंजय क्षीरसागर, प्रा. एम. एन. वनखंडे, प्रा. प्राजक्ता डोंबे, डॉ. विनया पाटील, प्रा. वर्षा गारोळे, प्रा. स्मिता आगलावे, डॉ. बापूसाहेब घोडके, डॉ. हर्ष घळके, अमोल माने, अभिषेक साळुंखे, संकेत वगैरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सहसमन्वयक डॉ. महादेव कोरी यांनी आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 17