सोलापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने निर्बीजीकरण आणि निवारा केंद्र उभारण्यावर भर दिला आहे. शहरात सध्या सुमारे ३५ हजार भटकी कुत्री असून, त्यांच्या निर्बीजीकरणासह आवश्यक उपाययोजनांसाठी ७ कोटी २० लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिका स्थायी समितीची सभा सोमवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत शहरातील नागरी सुविधांशी संबंधित पाच विषयांना मान्यता देण्यात आली. सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व उपाययोजनांसाठी ७ कोटी २० लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला होता. उपलब्ध निधीचे पुनर्विनियोजन करून सुधारित अंदाजपत्रकात निधी उपलब्धतेनुसार ही तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. देगाव येथील एसटीपी प्लांटसमोर साडेचार एकर जागेवर एक हजार कुत्र्यांच्या क्षमतेचे निवारा केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे.
शहरात सध्या सुमारे ३५ हजार भटकी कुत्री आहेत. त्यांच्या निर्बीजीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या दररोज सरासरी १८ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येतात. या कामासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. देगाव येथील एसटीपी प्लांटसमोरील साडेचार एकर जागेवर निवारा केंद्र उभारण्यात येणार असून, प्रत्येकी दहा कुत्र्यांची क्षमता असलेले १०० केज तयार करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे एकावेळी सुमारे एक हजार कुत्र्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था होणार आहे.
या विभागात सध्या दोन डॉक्टर आणि चार मदतनीसांसह साधारण आठ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र मंजूर आकृतीबंधानुसार सुमारे ६० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढविण्याची सूचनाही करण्यात आली आहे. निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रियांचा वेग वाढविण्यासह निवारा केंद्राच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
प्राणिसंग्रहालयातील खाद्यपुरवठ्याला मान्यता
महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना चिकन, म्हैसवर्गीय बीफ आणि अंडी पुरविण्यासाठी मे. उन्नती कन्स्ट्रक्शन यांना मंजूर दराने दिलेल्या वर्कऑर्डरची माहिती स्थायी समितीने घेतली. त्यानुसार चिकनसाठी प्रतिकिलो २४० रुपये, बीफसाठी २३० रुपये आणि अंड्यासाठी प्रतिनग पाच रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.
पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी चार मक्तेदार
विभागीय कार्यालय क्रमांक एक ते आठ आणि मुख्य कार्यालयांतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सन २०२६-२७ करिता चार मक्तेदारांचा वार्षिक मक्ता निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली. डीआय, एमएस पाइपलाइनची दुरुस्ती, विशेष दुरुस्ती तसेच स्लुईस व्हॉल्व्ह पुरविणे व बसविणे या कामांचा यात समावेश आहे. यासाठी सुमारे चार कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
कब्रस्तानातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण
प्रभाग क्रमांक २२ मधील जन्नतुल फिरदोस कब्रस्तान येथे रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी देण्यात आलेल्या वर्कऑर्डरची माहिती समितीने घेतली. तसेच विभागीय कार्यालय क्रमांक सहाअंतर्गत दैनंदिन देखभाल व किरकोळ दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी श्रीकांत सिद्राम भोळे यांची मंजूर निविदा दराने मक्तेदार म्हणून नियुक्ती करून वर्कऑर्डर देण्यास मान्यता देण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन नागरी सुविधांशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.
निवारा केंद्र प्रकल्प अहवाल याप्रमाणे
डॉग शेल्टर १००० -३.१२ कोटी रुपये
एबी सी सेंटर – २.५० लाख रुपये
ऑपरेशन थेटर – ५६.५१ लाख रुपये
डेव्हलपमेंट – १.२१ कोटी रुपये
इलेक्ट्रिकल कॉस्ट – ६१ लाख रुपये
अग्निशमन यंत्रणा – २० लाख रुपये
एकूण – ८ कोटी १४ लाख ८३ हजार ५७० रुपये.
जीएसटी सह एकूण — ९ कोटी ९९ लाख ९६ हजार ६३८ रुपये
Post Views: 14