सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान किंवा बोनस मंजूर करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे सांगोला तालुकाप्रमुख दादासाहेब भगवान लवटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून, ग्रामरोजगार सहाय्यकांना ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा विचार करावा, अशी विनंती केली आहे.
ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनांच्या अंमलबजावणीत ग्रामरोजगार सहाय्यकांची भूमिका महत्त्वाची असते. मस्टर भरणे, जॉब कार्ड वाटप, कामांची मोजमाप प्रक्रिया, हजेरीपत्रक तयार करणे, ऑनलाइन नोंदी करणे तसेच ग्रामपंचायतीच्या विविध कामकाजात सहकार्य करणे, अशा जबाबदाऱ्या ते पार पाडतात. मात्र, विविध प्रशासकीय कामांचा व्याप सांभाळताना त्यांना मिळणारे मानधन कमी असल्याने सणासुदीच्या काळात आर्थिक मदतीची गरज असल्याचे लवटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असून, या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी सानुग्रह अनुदान देण्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही ग्रामीण रोजगार योजनांशी संबंधित कामे करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
चौकट
प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
ग्रामरोजगार सहाय्यकांना दिवाळी बोनस किंवा सानुग्रह अनुदान मंजूर झाल्यास त्यांना सणाच्या काळात आर्थिक आधार मिळू शकतो. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे संबंधित कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.