सोलापूर – सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त, विश्वास आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धतीला विशेष महत्त्व असते. याच तत्त्वांचा आदर्श घालून देत भंडारकवठे विविध कार्यकारी सेवा सोसायटीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सभासदांना १२ टक्के दराने लाभांश (डिव्हिडंड) वाटप करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. संस्थेची वार्षिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली असून, यावेळी लाभांश वाटपाची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, संस्थेकडून सलग चार वर्षांपासून सभासदांना नियमितपणे लाभांश वाटप करण्यात येत आहे. सहकारातील सभासदांचा विश्वास जपत आर्थिक वर्षागणिक लाभांश देण्याची ही परंपरा संस्थेच्या नियोजनबद्ध कामकाजाची आणि आर्थिक बांधिलकीची साक्ष देणारी ठरत आहे.
विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही ग्रामीण भागातील शेतकरी आणि सभासदांसाठी आर्थिक आधाराचे महत्त्वाचे केंद्र असते. अशा परिस्थितीत सभासदांच्या हिताला प्राधान्य देत १२ टक्के लाभांश देणे ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वार्षिक सभेस संस्थेचे चेअरमन नामदेव (प्रवीण) बिराजदार, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, सोमनिंग विरदे, सोमनिंग कमळे, स्वामी वीरपाक्ष, अमसिद्ध मुक्काणे, संतोष बिराजदार, मुकेश वहनकोरे, राहुल पाटील, बाळासाहेब मैदगी, सिद्धाराम बिराजदार यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
Post Views: 7