सोलापूर – जिल्हा बँक निवडणुकीसाठी ११ मतदान केंद्र राहणार असून २६ नोव्हेंबरला मतदान तर २७ नोव्हेंबरला निकाल दिला जाणार आहे. निवडणुकीची मतमोजणी २७ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून हैदराबाद रोडवरील सहकार महर्षि वि. गु. शिवदारे अण्णा सभागृहात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी माहिती दिली आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ तालुक्यासाठी प्रत्येकी ११ मतदान केंद्रात २६ नोव्हेंबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. २ हजार ५९६ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. जिल्हा बँकेच्या १९ पैकी १० जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणूक ९ जागांसाठी २४ उमेदवार मैदानात आहेत.
अक्कलकोटमधील स्वामी समर्थ सहकारी बँकेची शाखा (ए-वन चौक), बार्शीत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची शाखा (ढगे मळा), करमाळ्यात पंचायत समिती सभागृह, माळशिरसमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्या शाळा, माढ्यात सहाय्यक निबंधक कार्यालय, मंगळवेढ्यात जिजामाता प्रशालेतील शिशुविहार (दुर्गामाता नगर, कारखाना रोड), मोहोळमध्ये गटसचिव मिटिंग हॉल (बाजार समिती आवार), पंढरपूरमध्ये शेतकरी निवास (बाजार समिती), सांगोल्यात पंचायत समितीचे बचत भवन, उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सोलापूर शहरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी सोलापुरातील रंगभवन येथील समाजकल्याण केंद्र या ठिकाणी मतदान केंद्र असणार आहेत.



















