बार्शी – वाढदिवस म्हटले की केक, चॉकलेट आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, या परंपरेला ज्ञानदानाची जोड देत सुयश विद्यालय, तांदूळवाडी येथील विद्यार्थ्यांनी एक आदर्श उपक्रम राबविला आहे. इयत्ता चौथीतील अथर्व शिवाजी चौधरी आणि इयत्ता तिसरीतील रिया आनंद मोरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयाला नैतिक मूल्यांवर आधारित तब्बल ७१ पुस्तके भेट दिली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यावर बालवयातच चांगले संस्कार व्हावेत आणि गोष्टींच्या माध्यमातून नैतिक मूल्यांची रुजवण व्हावी, या उद्देशाने विद्यालयात ‘वाढदिवसानिमित्त एक पुस्तक भेट’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अथर्व आणि रिया यांनी दिलेल्या पुस्तकांच्या भेटीमुळे या उपक्रमात आणखी एक मोलाची भर पडली आहे.
दोन्ही विद्यार्थ्यांनी वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपल्या मित्र-मैत्रिणींनाही ज्ञानाचा लाभ मिळावा, या भावनेतून पुस्तकांची निवड केली. त्यांच्या या कृतीमुळे शालेय ग्रंथालय समृद्ध होण्यास मदत झाली असून इतर विद्यार्थ्यांनाही वाचनासाठी नवी पुस्तके उपलब्ध झाली आहेत. लहान वयातच सामाजिक जाणीव आणि वाचनप्रेम जोपासणाऱ्या या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी मुख्याध्यापक गणेश मोरे, उपमुख्याध्यापक सोमनाथ पवार, ग्रंथालय विभागप्रमुख माने मॅडम, मराठी विषय शिक्षक धनाजी मोरे, राजू शेख, शितोळे, येडवे तसेच इयत्ता तिसरी व चौथीचे शिक्षक उपस्थित होते.
अथर्व आणि रिया यांच्या या उपक्रमाचे संस्थापक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन करुन कौतुक केले. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा पुस्तकांची भेट देऊन ज्ञानाचा प्रसार करणे अधिक मोलाचे ठरु शकते.