सोलापूर : विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभारण्याचे स्वप्न पाहावे, नवकल्पनांना व्यावसायिक स्वरूप द्यावे आणि उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, या उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तीन दिवसीय उद्योजकता जागरूकता शिबिर घेण्यात आले. या शिबिरात बी. फार्मसी आणि एम. फार्मसीच्या १३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
दि. १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या शिबिरात जिल्हा उद्योग केंद्राचे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर कफिल शेख यांनी उद्योजकीय दृष्टिकोनाचे महत्त्व विशद केले. Aquadry Pharma चे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत सदाफुले यांनी उद्योजकतेचा करिअर पर्याय आणि स्वतःच्या अनुभवातून व्यवसाय उभारणीचे धडे दिले. नागेश कोकरे यांनी संशोधन, उत्पादन विकास आणि व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले.दुसऱ्या दिवशी बायोलश प्रा. लि.चे संचालक शफिक शेख यांनी आयात-निर्यात व्यवसाय, तर कराड को-ऑपरेटिव्ह बँकेचे अविनाश जोशी यांनी आर्थिक सहाय्य व प्रकल्प अहवाल लेखनाची माहिती दिली. तिसऱ्या दिवशी डॉ. गणराज माने, माजी विद्यार्थी मैनुद्दीन जमादार आणि आयेशा शेख यांनी उद्योग व्यवस्थापन, मार्केटिंग, बिझनेस मॉडेल, उद्योजकीय गुण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर मार्गदर्शन केले. राम सुतार यांनी एमआयडीसीतील औद्योगिक जागा मिळविण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली.
प्राचार्य डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. राम सुतार यांनी समन्वय साधला. संस्थाध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात यशस्वी उद्योजक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विश्वस्त प्रा. बी. व्ही. शेटे यांनी शुभेच्छा दिल्या. एम. फार्मसी विभागप्रमुख डॉ. आफाक अन्सारी यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
—
Views: 16