जेऊर – उजनी धरण परिसरात प्रस्तावित AI डेटा सेंटरसह अन्य औद्योगिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि धरणग्रस्तांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकल्पाच्या संभाव्य परिणामांबाबत स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त होत असताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या प्रकरणावर आपली भूमिका जाहीर करावी, अशी आक्रमक मागणी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे.
कांबळे म्हणाले की, “आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की सरकारच्या बाजूने, हे दोन्ही नेत्यांनी स्पष्टपणे जनतेसमोर सांगावे. केवळ राजकीय भाषणे करून चालणार नाही, तर स्थानिक जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे.”
पुढे बोलताना कांबळे यांनी सांगितले की, उजनी धरण हे या परिसरातील शेती, पिण्याचे पाणी, मत्स्यव्यवसाय आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे या परिसरात प्रस्तावित होणाऱ्या कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचा निर्णय घेताना पर्यावरणीय परिणाम, पाण्याची उपलब्धता, स्थानिक नागरिकांचे हित आणि भविष्यातील जलसुरक्षा या मुद्द्यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. प्रकल्पामुळे नेमके किती पाणी लागणार, त्याचा जलसाठ्यावर काय परिणाम होणार, पर्यावरणावर कोणते परिणाम संभवतात आणि स्थानिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याची पारदर्शक माहिती जनतेसमोर आली पाहिजे.
शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे की राजकीय स्वार्थ? हा प्रश्न आज या भागातील जनतेसमोर उभा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे. त्यांनी केवळ मौन बाळगून चालणार नाही. या प्रकल्पाला समर्थन आहे की विरोध, तसेच शेतकरी, मच्छीमार आणि धरणग्रस्तांच्या मागण्यांना त्यांचा पाठिंबा आहे की नाही, हे स्पष्ट करावे.
आज भूमिका स्पष्ट करण्याची खरी वेळ आली आहे. राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचे भविष्य, जनतेचे पाणी आणि उजनीच्या परिसराचे पर्यावरण महत्त्वाचे आहे. जनतेच्या प्रश्नांवर नेत्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
“नेत्यांनी आता मौन सोडावे, जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपली भूमिका स्पष्ट करावी,” अशी ठाम मागणी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे.