सोलापूर : सोलापूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स शहर जिल्हा संस्थेच्यावतीने आजपासून स्काऊट-गाईड प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार दि. २३ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत इयत्ता १ ली ते ४ थीच्या शिक्षकांसाठी कब मास्टर प्राथमिक व प्रगत, तर ५ वी ते १० वी च्या शिक्षकांसाठी स्काऊट मास्टर प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबिर होणार आहे. हे सात दिवसांचे निवासी प्रशिक्षण श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, हत्तुरे नगर, विमानतळासमोर, सोलापूर येथे होत आहे.
या प्रशिक्षणातून शिक्षकांना विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, संस्कार,संचलन,अभ्यासक्रम,राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार व विविध उपक्रम कसे घ्यायचे याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. कब मास्टर रमेश बोबडे (यवतमाळ), कब मास्टर शंकरराव यादव (सोलापूर), स्काऊट मास्टर श्रीधर मोरे (सोलापूर), स्काऊट मास्टर चैत्राम निकम (धुळे) हे शिबिर प्रमुख म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात संतोष परंडवाल व जीवन मटके (मुंबई), राफेल जॉन स्वामी (पुणे) यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षणात पहाटे ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत रामधून, योगा, प्राणायाम, बी.पी. सिक्स, तंबू सजावट, गॅजेट्स, इन्स्पेक्शन, ध्वजारोहण, गाठींचे प्रकार, मैदानी खेळ, शेकोटी कार्यक्रम व अभ्यासक्रमातील घटक शिकवले जाणार आहेत.
*महिला शिक्षकांसाठी स्वतंत्र शिबिर*
नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल, निलम नगर,आकाशवाणी रोड, एम.आय.डी.सी., सोलापूर येथे महिला शिक्षकांसाठी दि. २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान फ्लॉक लीडर व गाईड कॅप्टन प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबिर होणार आहे. शहर- जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, आश्रम व इंग्लिश मीडियम शाळांतील शिक्षक-शिक्षिकांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा ट्रेनिंग कमिशनर शंकरराव यादव, जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, जिल्हा गाईड संघटका अनुसया शिरसाट यांनी केले आहे.