पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शेतकरी संघटनेची जरी ३ हजार ५०० रुपयांची मागणी असली तरी सोलापूर जिल्ह्यातील प्राप्त परिस्थिती लक्षात घेता कुठेतरी मार्ग काढण्याची गरज होती. त्या प्रमाणे जे मिळणारच नाही म्हणत होते त्यांना आंदोलनापुढे नमवून ३ हजार ४५० रुपयांवर राजी करण्यात शेतकरी संघटनांना यश आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते सचिन पाटील यांनी दिली.
या बरोबरच माजी खासदार राजु शेट्टी यांनी ज्या ज्या वेळी श्री विठ्ठलाला साकडे घातले त्या त्या वेळी श्री विठ्ठल शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. या वेळी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी खरोखरच हवालदिल झाल होता. मात्र याही परिस्थितीत शेतकरी संघटनेच्या पाठीमागे तो ठामपणे उभा राहिला तो केवळ श्री विठ्ठलाच्या कृपेमुळेच आणि संघटना दर मिळवून देणार या भऱोशावरच. त्यामुळे याही वेळी माजी खासदार राजु शेट्टी यांनी विठुरायाला घातलेले साकडे पुर्णत्वास गेल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या उस दराचा कांडका पाडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजु शेट्टी यांनी आपला मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळविला होता. राज्याच्या विचार करता जिल्ह्यातील सर्वात जास्त साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकीक आहे. मात्र तेथील कारखानदार शेतकरी सभासदांना म्हणावा तसा दर देत नाहीत. त्यामुळे या वर्षी आम्ही ३ हजार ५०० रुपये दर घेणारच म्हणत पंढरपूरच्या विठुरायाला साकडे घालून सोलापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केलेले होते.
त्यावेळी कारखानदारांना ३ हजार ५०० दर घेतल्या शिवाय कारखाने सुरु करु दिले जाणार नाहीत असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्या नंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या मध्ये देखील तोडगा निघाला नाही. त्यावेळी कारखानदारांच्या ताठर भूमिकेमुळे बोलणी फिस्कटली. त्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची मूदतीत कारखानदारांनी आपली भूमिका स्प्षट् करावी तो पर्यंत उसतोड थांबवून कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
दरम्यान साखर कारखानदारांकडून कोणताच प्रस्ताव येत नसल्याने शेतकरी संघटनांचे पदाधिकारी देखील आक्रमक झाले. त्यांनी सोलापूर कडे येणारे सर्व महामार्ग रोखून धरण्याचा इशारा दिला. या बरोबरच जे कारखाने सुरु होते त्यांची वाहने रोखून धरली. मात्र जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांनी केलेल्या आवाहना नुसार माढ्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना आणि गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना तसेच मोहोळ येथील राजन पाटील यांच्या कारखाना तसेच अकलुजचे बाळदादा मोहिते पाटील यांच्या मध्ये शनिवारी दरा संदर्भात बैठक झाली. अखेर वरील कारखान्याच्या कारखानदारांनी पुढाकार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला प्रस्तावाला संमती दिली.
दरम्यान या चर्चेसाठी रविवारी पंढरपूरातील विश्रामगृहा मध्ये पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी तसेच इतर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन दरा संदर्भात संघटनेला तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देखील मंजुरी संदर्भातील पत्र दिले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे येथील पदाधिकारी सचिन पाटील, दीपक भोसले, समाधान फाटे, तानाजी बागल आदींसह संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला.
——————-
चौकट : ( जिल्ह्यातील उसदराचा असा ठरला फाँर्म्युला )
पहिली उचल प्रतिटन ३ हजार २५० रुपये, त्यानंतर कारखाना बंद होताना शंभर रुपयां प्रमाणे एक हप्ता तसेच दीवाळी सणासाठी १०० रुपये हप्ता देवून साधारणपणे एकुण ३ हजार ४५० रुपये प्रतिटन दर दिला जाणार. दरम्यान शेतकरी संघटनेच्या ३ हजार ५०० रुपयांच्या मागणीवर देखील ज्यावेळी साखरेचे दर ४५ रुपयांच्या पुढे जातील त्यावेळी ७० : ३० फाँम्युर्ला नुसार संघटनांनी उरलेला दर शेतकऱ्यांना देण्या संदर्भात कारखानदारांकडून लेखी हमी घेतल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी सांगितले.
——————-
चौकट : ( जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली महत्वाची भूमिका )
ऊसदरावरून निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी महत्वाची भूमिका बाजवली. त्यांनी संघटना आणि कारखानदार यांच्या मध्ये मध्यस्थी केली. कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात तोडगा निघावा, यासाठी त्यांनी कारखानदारां समोर टप्प्याटप्प्याने ऊसदर देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर चर्चा होवून चर्चेअंती मार्ग निघून दर निश्चित होवून दराचा कांडका पडला.
———————–
चौकट : ( कारखानदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन) जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिलेला प्रस्ताव मान्य करत सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना. आमदार अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना. या कारखान्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी पत्र देण्यात आलेले आहे.
—————–
चौकट : ( ऊस परजिल्ह्यात जाऊ लागल्याने कारखानदार नरमले )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उस दराच्या आंदोलना बरोबरच बाहेरील जिल्ह्यातील कारखानदारांना जिल्ह्यातील उस नेण्यासाठी पाचारण केले. त्या प्रमाणे पंढरपूर तालुक्यातून तसेच इतर ठिकाणाहून कर्नाटक तसेच परजिल्ह्यातील तोडणी मजूर येवून ते येथील ऊस बाहेर घेऊन जावु लागले. त्यामुळे यंदा उसाची टंचाई असल्यामुळे आपल्या कारखान्यांना पुन्हा अडचण येणार म्हणून कारखानदारांनी दोन पावले मागे जात उसदरावर तोडगा काढला )
———————
चौकट : (मयत कार्यकर्त्यांला मदतीचे आवाहन )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर येथील मोर्चात सहभागी होवून घरी परत गेलेल्या शेतकरी संघटनेचा पदाधिकारी कार्यकर्ता असलेला सोमनाथ शेळके या शेतकऱ्यांचे त्याच रात्री हदयविकारने निधन झाले. त्यामुळे शासना बरोबरच सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी आपआपल्या परिने कारखान्याच्या वतीने या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे येथील नेते सचिन पाटील यांनी केले आहे.
————————-
कोट
शेतकरी संघटनेच्या या उस आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही शेतकरी तसेच पदाधिकाऱ्यांना आंदोलनात सहभागी झाला म्हणून जर जिल्ह्यातील कोणत्याही कारखानदारांनी त्रास देवून त्यांचा उस शेतात ठेवला तर संबंधित कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल हा आमचा इशारा आहे.
Views: 25