सोलापूर : शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विशेष प्लास्टिकविरोधी मोहिमेत ४८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. शहरातील विविध झोनमधील ८४ आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना १० दंड पावत्या देण्यात आल्या. या कारवाईतून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेच्या आठही झोनमध्ये एकाच दिवशी ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये झोन क्रमांक २ मध्ये सर्वाधिक ४० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. या झोनमध्ये तीन दंड पावत्यांद्वारे १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. झोन क्रमांक ३ आणि ४ मध्ये प्रत्येकी १० हजार रुपये, तर झोन क्रमांक १, ५ आणि ६ मध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
झोन क्रमांक १ मध्ये १० आस्थापनांची तपासणी करून ६०० ग्रॅम, झोन क्रमांक ३ मध्ये आठ आस्थापनांची तपासणी करून तीन किलो, झोन क्रमांक ४ मध्ये ११ आस्थापनांची तपासणी करून १ किलो २५० ग्रॅम, झोन क्रमांक ५ मध्ये ११ आस्थापनांची तपासणी करून एक किलो आणि झोन क्रमांक ६ मध्ये १३ आस्थापनांची तपासणी करून एक किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
झोन क्रमांक ७ मध्ये १६ आस्थापनांची, तर झोन क्रमांक ८ मध्ये पाच आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या दोन्ही झोनमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली नसली तरी अनुक्रमे एक किलो आणि २०० ग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले.प्लास्टिकचा वापर आणि विक्री रोखण्यासाठी महापालिकेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि शहरातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार आहे.
—-
Views: 6