सोलापूर : महापालिकेतील नालेसफाई कामातील कथित गैरव्यवहार प्रकरणावरून प्रशासन आधीच संशयाच्या भोवऱ्यात असताना आता या प्रकरणाशी ठपका असलेले संबंधित अधिकारी पुन्हा एकाच परिवहन विभागात कार्यरत होणार आहेत. कनिष्ठ अभियंता गिरीश पुकाळे यांची परिवहन विभागात बदली करण्यात आली असून उपअभियंता सारिका आकुलवार यांच्याकडे यापूर्वीच परिवहन विभागासह अन्य चार विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यासंदर्भात कार्यालयीन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परिवहन विभागातील गिरीश पुकाळे यांना नगर अभियंता विभागाकडे प्रतिनियुक्तीने काम पाहण्यास सांगण्यात आले होते. तर महापालिकेच्या नगर अभियंता विभागातील कनिष्ठ अभियंता आकाश प्रमोद किर्तने यांची परिवहन विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. आता या दोघांच्या प्रतिनियुक्त्या संपुष्टात आणून त्यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी काम पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आकाश किर्तने यांना नगर अभियंता विभागातील वाहन विभागात तर गिरीश पुकाळे यांना परिवहन विभागात काम पाहावे लागणार आहे.
दरम्यान, नालेसफाईतील कथित गैरव्यवहारप्रकरणी तक्रारदार तथा भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी जबाबदाऱ्यांचे वाटप केले जात असल्याचा आरोप नगरसेवक जाधव यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सारिका आकुलवार यांच्याकडे परिवहन विभागासह अन्य चार विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यातच आता गिरीश पुकाळे यांचीही परिवहन विभागात नियुक्ती झाल्याने दोन्ही अधिकारी एकाच विभागात कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे नालेसफाई गैरव्यवहाराच्या चौकशीवर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांना एकच विभागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यामागील प्रशासनाची भूमिका काय तसेच चौकशी निष्पक्ष होण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे का असे सवाल नगरसेवक अनंत जाधव यांनी उपस्थित केला आहे. या गंभीर प्रकरणी अशा पद्धतीने आदेश काढून वरिष्ठांकडून जणू चेष्टाच केली जात असल्याचे असल्याचा आरोप नगरसेवक अनंत जाधव यांनी केला आहे.
—–
Views: 12