मोहोळ : रस्त्यावर सापडलेले सोन्याचे दागिने स्वतःकडे न ठेवता ते प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या मोहोळमधील तीन विद्यार्थ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे एका महिलेला तब्बल ६२ हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ पुन्हा मिळाली. विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कार्याबद्दल मोहोळ पोलिसांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
श्रीमती अश्विनी अनिल कोळी (रा. बागवाननगर, कुरुल रोड मोहोळ) यांची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ पर्समध्ये ठेवलेली होती. दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी मोहोळ बसस्थानक ते चंद्रमौळी गणेश मंदिरादरम्यान प्रवास करताना अनावधानाने त्यांची बोरमाळ असलेली पर्स पडली.
दरम्यान, राज विकास शिरसाट, अभिषेक किरण बनसोडे आणि रविराज गणेश गायकवाड (रा. दत्तनगर, मोहोळ) हे विद्यार्थी चहा पिण्यासाठी चंद्रमौळी गणेश मंदिराकडे जात असताना त्यांना रस्त्यावर एक पाकीट आढळून आले. पाकिटात सोन्याचा दागिना असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कोणताही मोह न ठेवता तत्काळ ते पाकीट मोहोळ पोलीस ठाण्यात आणून जमा केले.
मोहोळ पोलिसांनी पाकिटातील माहितीच्या आधारे अश्विनी कोळी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपली बोरमाळ हरवल्याचे सांगितल्यानंतर खातरजमा करून ६२ हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ त्यांना आहे त्याच स्थितीत परत करण्यात आली.
पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे.
चौकट : प्रामाणिकपणाचा आदर्श; विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
६२ हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ सहज स्वतःकडे ठेवण्याचा मोह टाळून ती पोलिसांकडे जमा करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी समाजासमोर प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे. विद्यार्थ्यांच्या या कृतीतून आजच्या तरुण पिढीमध्येही सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये जिवंत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
Views: 11