जेऊर – करमाळा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व पशुपालकांसमोर जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली असून जनावरांचे संगोपन करणे पशुपालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तालुक्यातील विविध गावांमध्ये चारा डेपो सुरू करून मुरघास (सायलेज), हिरवा चारा व पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मा. बाळासाहेब बिचितकर यांनी तहसीलदार, करमाळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
करमाळा तालुक्यात दूध व्यवसाय हा अनेक शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. मात्र, चारा व पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनात घट होत असून पशुपालकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांवर तर आर्थिक अडचणींमुळे आपली जनावरे विकण्याची वेळ येत आहे. ही बाब ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त गावांमध्ये तातडीने चारा डेपो सुरू करावेत, मुरघास व हिरवा चारा अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावा, लहान व अल्पभूधारक शेतकरी तसेच दूध उत्पादक पशुपालकांना प्राधान्य द्यावे, चारा व पाणीटंचाईचा सर्वे करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि गरजेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी व शेतकरी-पशुपालकांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकरी व पशुपालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असा इशाराही बाळासाहेब बिचितकर यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सोलापूर तसेच उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डुवाडी यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.
— मा. बाळासाहेब बिचितकर
पंचायत समिती सदस्य, करमाळा