सोलापूर – श्रीशैल नगर येथील अनिता आयवळे यांच्या चक्क घरातच भारतातील अतिशय विषारी जातीचा घोणस साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
अनिता घरामध्ये भांडी धूत असताना बाजूला त्यांना थोडी हालचाल जाणवली. बारकाईने पाहिल्यानंतर तिथे घोणस असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सर्पमित्र संतोष बगले यांना फोन करून माहिती दिली.
फोन येताच काही मिनिटांत सर्पमित्र संतोष बगले घटनास्थळी पोहोचले. घोणस साप अत्यंत चिडलेल्या अवस्थेत व बचावात्मक स्थितीत असल्याने अत्यंत सावधगिरीने त्याचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. साप पकडताना अनिकेत कदम व संदीप लंगडे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे रेस्क्यूची प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आली.
रेस्क्यू केल्यानंतर घोणस सापाला सुरक्षित डब्यात ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.




















