सोलापूर – अहोरात्र समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस भगिनींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोलापुरात अभिनव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने एका विशेष रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
‘अभिनव सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने सोलापूर शहर आयुक्तालय गांधीनगर येथे हा पवित्र उत्सव सोलापूर शहर गुन्हे व विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेच्या अध्यक्षा मीनल दास यांच्या नेतृत्वाखाली पार पडला असून या अनोख्या उपक्रमांतर्गत शहर पोलीस आयुक्तालयातील विविध समित्यांवरती कार्य करणाऱ्या सर्व महिला सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भगिनींच्या हातावर संस्थेच्या वतीने राखी बांधून त्यांच्या सुरक्षेच्या आणि धैर्याच्या प्रवासाला सलाम केला.
अहोरात्र समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व्यवस्था सुव्यवस्थित राहण्यासाठी तैनात असणाऱ्या महिला भगिनी खंबीरपणे भावाप्रमाणेच संरक्षण करतात. नेहमीच सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर खडेपाय असणाऱ्या या महिला पोलिसांसोबत हा सण साजरा करून समाजात एक कौटुंबिक आणि आदरयुक्त संदेश देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. गुन्हे व विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त आदरणीय अश्विनी पाटील मॅडम यांनी संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाची प्रशंसा केली. तसेच इथून पुढे देखील कुठेही अन्याय घडत असल्यास त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर राहू अशी ग्वाही देऊन संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सरोजिनी माकाई, अनिता वाघमारे, संजीवनी सलबत्ते, जयश्री रानसरजे, अरुणा जाधव, अफ्रीन पटेल, अन्नपूर्णा स्वामी, सोनाली भागानगरे, विद्या दीक्षित, सुरेखा येवले आदी उपस्थित होते.





















