बार्शी – उन्हाळ्याची चाहूल लागताच तापमानात झपाट्याने वाढ होत असून, कडक उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत शहरात कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी, मजूर व सर्वसामान्य वाटसरुंना पिण्याच्या पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने बार्शीत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.
“मोरया क्रिकेट क्लब” आणि माजी नगराध्यक्ष कै.श्रीकांत पिसे यांच्या नावाने स्थापन केलेल्या “धर्मात्मा युवा मंच” बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मोफत ‘पाणपोई’ सुरु करण्यात आली असून, या पाणपोईचे उद्घाटन विनोद वडतिले आणि योगेश शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी विविध कामांसाठी बार्शीत येत असतात. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन त्यांच्या तहान भागवण्यासाठी व नागरिकांना दिलासा मिळावा या उदात्त हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सागर सोत्रे यांनी विशेष पुढाकार घेतला.
याप्रसंगी सागर सोत्रे, विनोद वडतिले, तुकाराम कुंचे, योगेश शुक्ला, अजय परदेशी, धनंजय धारुरकर, आकाश सोत्रे, भालचंद्र गुंगे, राम बोविंदवार, आनंद देबडवार, महादेव चौधरी, पंकज अलमलकर, समर्थ हिंगमिरे व प्रवीण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे, मोफत पाणपोईचा हा उपक्रम यंदा सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात येत असून, या सामाजिक जाणिवेच्या कार्याचे बार्शी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. उन्हाच्या कडाक्यात या पाणपोईमुळे नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
















