सोलापूर – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सभापती दिलीप माने, उपसभापती ब्रम्हानंद कळके यांच्यासह १२ संचालकांच्या निवडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेची सुनावणी १९ जून २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालय, लातूर येथे होणार आहे. त्यामुळे कृषी व सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
तक्रारदार मिलिंद मुळे आणि राहुल बनसोडे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीतील काही संचालकांच्या पात्रतेवर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने एप्रिल २०२५ मध्ये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम २०१७ मधील नियम ७२ (अ) अंतर्गत निवडणूक याचिका दाखल करण्याचा मार्ग खुला करण्यात आला होता.
त्यानुसार संबंधितांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अपील दाखल केले. मात्र प्रक्रियेदरम्यान विविध प्रशासकीय कारणांमुळे हे प्रकरण प्रथम सोलापूर, त्यानंतर धाराशिव आणि अखेरीस राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार लातूर येथे वर्ग करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी रखडल्याने अपीलकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.
या प्रकरणात सभापती दिलीप माने, उपसभापती ब्रम्हानंद कळके यांच्यासह १२ संचालकांविरोधात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे १९ जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे बाजार समितीच्या राजकारणाशी संबंधित सर्व घटकांचे लक्ष लागले आहे. सुनावणीनंतर या प्रकरणात कोणते निर्देश किंवा निर्णय दिले जातात, यावर बाजार समितीच्या पुढील प्रशासकीय आणि राजकीय घडामोडींचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Post Views: 18