सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात तंत्रशास्त्र संकुला अंतर्गत यावर्षीपासून बी.टेक. च्या आठ अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2026 – 27 मध्ये प्रवेशित प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचा “आरंभ 2026” हा स्वागत समारंभ विद्यापीठांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
बी. टेक च्या प्रत्येक विद्यार्थ्याचे, त्यांच्या पालकांचे, सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रमुख पाहुण्या श्रीमती बॉबी सिंग, मुंबई, प्र- कुलसचिव डॉ. अतुल लकडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखा अधिकारी सीए डॉ. महादेव खराडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास तेळवेकर, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महेश खरात, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, तंत्रशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विकास तागड आदींची मंचावर उपस्थिती होती.
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःशी स्पर्धा करावी. आपला आपल्यावर विश्वास पाहिजे. आत्मविश्वास डळमळीत होता कामा नये. आपण मला कधीही भेटू शकता, आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या मला सांगू शकता. आपणास माझ्या दालनाची दारे सदैव उघडी आहेत. आपल्याला विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येतील असे आश्वासन कुलगुरूनी विद्यार्थी व पालकांना दिले.
आपण बी. टेक. चे विद्यार्थी विद्यापीठाचे ब्रँड अँबेसेडर आहात. त्यानुसार आपण प्रत्येकाने जबाबदारी घेऊन आपल्या शैक्षणिक प्रगतीबरोबर विद्यापीठाच्या नवलौकीकात भर घालण्यासाठी आपले योगदान द्यावे. दर तीन महिन्यांनी शिक्षक – पालक बैठक घेण्याचा आमचा मानस आहे. या पहिल्या बॅचच्या विद्यार्थी व पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करून ही सर्व वृक्ष चार वर्षापर्यंत जोपासली जावीत, वाढवली जावीत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपण लावलेल्या रोपाची काळजी घ्यावी असेही आवाहन कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी त्यांच्या भाषणामध्ये केले.
प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांनी विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करण्यासाठी काय करावं, त्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत याचे छोटेसे प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रत्येकाने आपले शंभर टक्के योगदान देणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला यश प्राप्त होऊ शकते असा अत्यंत मोलाचा संदेश त्यांनी आपल्या मनोगत आतून दिला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या बॉबी सिंग, संचालक, एस.डी.बी.आय. मुंबई यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी सांगितल्या. ध्येय निश्चित करा, ध्येय पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून स्वतःवर विश्वास ठेवा.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रशास्त्र संकुलाचे संचालक प्रा.(डॉ.)विकास तागड यांनी केले. त्यांनी तंत्रशास्त्र संकुलाची भूमिका, स्वागत समारंभाचे उद्दिष्ट आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवासाची, विद्यापीठाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध बाबींची पालक आणि विद्यार्थ्यांना इत्यंभूत माहिती दिली आणि सर्वांचे स्वागत केले.
विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्या मनोगतातून विद्यापीठात सुरू झालेल्या बी. टेक च्या अभ्यासक्रमामुळे समाधान व्यक्त केले. विद्यापीठाकडून प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते त्यामुळे आम्ही पालक म्हणून निश्चिंत आहोत. आमचे विद्यार्थी नक्कीच हे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये उत्तमरीत्या उभे राहतील असा विश्वास पालक प्रतिनिधी श्री. अरविंद चौधरी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे तर आभार प्रा. (डॉ.)सविता बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तंत्रशास्त्र संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Post Views: 13