धाराशिव : अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करून ५९ प्रवर्गांमध्ये फूट पाडण्याचा राज्य सरकारचा डाव असून, हा निर्णय समाजहिताच्या विरोधात असल्याचा घणाघाती आरोप आमदार प्रवीण स्वामी यांनी केला. या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध करण्यात येणार असून, येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ठाम भूमिका मांडली जाईल. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील शासकीय विश्रामगृहात अनुसूचित जातीतील ५९ प्रवर्गांच्या उपवर्गीकरणाविरोधात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार स्वामी पुढे म्हणाले की, अनुसूचित जातींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात भक्कम तरतुदी केल्या आहेत. त्या तरतुदींना कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. सरकार हेतुपुरस्सर समाजात दुभंग निर्माण करत असून, हा डाव उधळून लावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय शिंगाडे यांची ठाम भूमिका; ‘निर्णय मागे घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलन’
बैठकीत संयोजक धनंजय शिंगाडे यांनी आक्रमक व स्पष्ट शब्दांत सरकारवर टीका करत उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र भूमिका मांडली.
शिंगाडे म्हणाले, उपवर्गीकरणामुळे समाजात तणाव वाढत असून, सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे. राज्यातील हजारो जातींमधील नागरिक आज अस्वस्थ आहेत. सरकार भीतीचे वातावरण निर्माण करत असून, हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलन उभारले जाईल.
ते पुढे म्हणाले की, महार समाजासह सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे; मात्र कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी होऊ नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. अ, ब, क, ड उपवर्गीकरणाचा घाट हा समाजात दुभंग निर्माण करणारा असून, तो आम्हाला मान्य नाही.
सरकारला थेट इशारा देत शिंगाडे यांनी सांगितले की, भीतीचे राजकारण थांबवा; अन्यथा ५९ जातींना सोबत घेऊन जिल्ह्यापासून राज्यभर व्यापक आंदोलन छेडले जाईल.
यावेळी प्रा. संजय कांबळे यांनी उपवर्गीकरणामुळे सामाजिक समतेच्या मूलभूत तत्त्वालाच धक्का बसत असल्याची भूमिका मांडली. संविधानिक आरक्षण व्यवस्थेत फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न समाजासाठी घातक ठरेल, असे ते म्हणाले.
तर राजाभाऊ ओव्हाळ यांनी ५९ प्रवर्गांनी एकसंघ राहून संघर्ष उभारण्याची गरज व्यक्त केली. समाजात कृत्रिम विभागणी निर्माण करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी एकमुखीपणे उपवर्गीकरणाला विरोध दर्शवित, ५९ जातींच्या एकत्रित शक्तीने हा लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. लवकरच आंदोलनाची दिशा निश्चित करून धाराशिव जिल्ह्यातून राज्यव्यापी आंदोलनाची ठिणगी पेटवली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीसाठी
ॲड ज्योती बडेकर ॲड इंद्रजीत शिंदे अनिल हजारे यशपाल बनसोडे अशोक बनसोडे उपस्थित होते

























