२०१० च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात, भावनिक वातावरणात आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर पार पडला. तब्बल १६ वर्षांनंतर एमआयडीसी येथील आशा मराठी विद्यालयाच्या प्रांगणात पाऊल ठेवताच प्रत्येकाच्या मनात बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या स्वागतानंतर शिपाई मामांनी वाजवलेल्या शाळेच्या घंटेने सर्वांना जुन्या दिवसांत नेले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, राष्ट्रगीत आणि परिपाठाने झाली. संस्थेच्या संस्थापक स्व. पठाण मॅडम, स्व. पठाण सर तसेच दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दीपप्रज्वलन संस्थाध्यक्ष असिफ पठाण, आशा मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका तस्लिमबानो पठाण, श्री धर्मण्णा सादूल प्रशालेच्या मुख्याध्यापिका अफरीन सय्यद यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी वर्गशिक्षक श्री. रामचंद्र गायकवाड यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा रोपभेट देऊन सन्मान करण्यात आला. यात हसीना शेख, नाहीद बिजली, राम गायकवाड, शिवानंद हिरेमठ, गंगाधर स्वामी, वीरभद्र यादवाड, लिंगय्या मेळकुंदे, राज अहमद शेख, शांतय्या कापसे, अमसिध्द सोनकंटले, जवळकोटे सर, असिफ बडेघर, गजानन पैलवान, श्रीगणेश सातपूते, पुष्पावती बबलादे, तबसूम सय्यद, तैसिन सय्यद, शोभा मुळे, संतोष सोड्डे, संतोष धारेराव, चंद्रकांत शिरगापूरे, महानंदा व्हसाळे, रेहाना मकानदार, सौरभ भांड, मिसबा जमादार, मुजावर मॅडम, अमीर पठाण, प्रफुल्ल बुगडे, जाधव मॅडम, मोहिनी भावे, वळसंगे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी वसिम शेख, दिलीप हळके, शिवाजी कुसेकर, एजाज जमादार, राजू कोळी, सिध्दू निंबाळ आदींचा समावेश होता.
गुरुजनांच्या मनोगताने वातावरण भावनिक झाले. सौ. झांबरे मॅडम यांच्या आठवणींनी सर्वांना भारावून टाकले, तर आर. बी. शेख सरांच्या शायरीने जुन्या दिवसांना उजाळा दिला. पहिल्या सत्राचा समारोप पूजा बिटला (पोगुल) यांनी आभारप्रदर्शन करून केला. दुसऱ्या सत्रात अरुंधती शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर पूजा आकेन यांनी आभार मानले.
*बालपण पुन्हा जगल्याचा अनुभव*
शाळेच्या जुन्या वर्गात पुन्हा बसण्याचा अनुभव माजी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत भावनिक ठरला. हजेरी देणे, स्वतःची ओळख करून देणे आणि आजच्या जीवनातील प्रवास सांगताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते. जुन्या बाकांवर बसून झालेल्या गप्पा, हास्य, खोड्या आणि सेल्फीमुळे बालपण पुन्हा जगल्याचा अनुभव मिळाला. गुरुजनांसोबतचा संवाद अधिकच जिव्हाळ्याचा ठरला. हा क्षण प्रत्येकासाठी आयुष्यभर स्मरणात राहील असा ठरला.
*खेळ व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन*
कार्यक्रमानंतर स्वरा मंगलकार्यालयात स्नेहभोजन, खेळ व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बलून गेम, गाण्याचा सूर ओळखा, डान्स, ग्रुप गेम्स आणि “खींच मेरे फोटो” या उपक्रमांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. लता अक्का यांच्या भावनिक निरोपाने वातावरण हेलावून गेले. पाणीपुरीचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा समारोप झाला. हा स्नेहमेळावा केवळ कार्यक्रम नसून मैत्री, संस्कार आणि शाळेशी असलेल्या अतूट नात्याचा उत्सव ठरला. २०१० बॅचची ही आठवण सर्वांच्या मनात कायम जिवंत राहील.
Post Views: 11