बार्शी – कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून मेहुण्याने भाऊजीस शिवीगाळ करत काठीने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले. शहरातील सिद्धार्थनगर, भिममनगर भागात घडली. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी राजू परमेश्वर शिंदे (४०, रा. सिद्धार्थनगर, भिममनगर, बार्शी) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राजू शिंदे आणि त्यांची पत्नी रजनी शिंदे यांच्यामध्ये घरासमोर घरगुती कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी फिर्यादीचा मेहुणा सुरज सुनिल कसबे (वय ३० वर्षे, रा. बार्शी) हा तिथे आला. तू माझे बहिणीसोबत का भांडण करतो असे म्हणत त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच जवळच पडलेली काठी घेऊन राजू शिंदे यांच्या डाव्या बाजूला डोक्यात मारून त्यांना जखमी केले.