माढा : सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी मनकर्णा ओढा , बेंद ओढ्यासह माढा परिसरातील इतर गावांना सोडण्याच्या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांनी अन्नत्याग आमरण उपोषण २५ ऑगस्ट रोजी माढा तहसील कार्यालयासमोर सुरू केले होते. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून सीना माढा संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी २७ ऑगस्ट रोजी बेमुदत रस्ता रोको करण्यात आला. रस्ता रोको दरम्यान शहराच्या मध्यभागी वाहनांच्या लांबच लांब रंगा लागल्या होत्या या अनेकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांच्यात भ्रमणध्वनी वरून चर्चेनंतर प्रशासनाने पाण्याबाबत ठोस आश्वासन दिले आहे.
सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या खरीप हंगाम २०२६-२७ मधील दुसऱ्या आवर्तनातून सध्या चिंचोली-बावी रस्त्यापासून चिंचोलीमार्गे पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. चिंचोली तलाव भरल्यानंतर चिंचोली, सापटणे, शिंदेवाडी, जाधववाडी मार्गे मनकर्णा ओढ्यावरील सर्व बंधारे, भांगे वस्ती बंधारा व पवार बंधारा भरेपर्यंत सातत्याने पाणी देण्यात येणार असल्याचे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
टेल भागातील सिंचन पूर्ण झाल्यानंतर शिंदे तलाव व वेताळवाडी पाझर तलाव भरण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने पत्रात स्पष्ट केले.
दरम्यान मनकर्णा ओढ्याला कालव्याचा दर्जा देण्याच्या मागणीसंदर्भात २ ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल,असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे कानडे यांनी तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेले अन्न त्याग आंदोलन व छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.२७ ऑगस्टला करण्यात आलेले बेमुदत रास्ता रोको आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा शेतकरी बांधवांच्या सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
यावेळी संघर्ष समितीचे सदस्य व माढ्यासह परिसरातील गावाचे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 55