सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर यावर्षीचा बीसीसीआयच्या 23 वर्षाखालील मुलांच्या कर्नल सी के नायडू चषकातील तिसऱ्या फेरीचा पहिला सामना महाराष्ट्र व रेल्वे संघात सुरू झाला असून पहिल्या दिवशी पाहुण्या रेल्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना दिवस अखेर 90 षटकात 4 बाद 259 धावा केल्या असून त्यांच्या कर्णधार विराट जैस्वाल तसेच जयंत कैवर्ट यांनी दमदार खेळी करत वैयक्तिक अर्धशतके झळकावली तर यजमान महाराष्ट्र संघाच्या तेज गोलंदाज ऋषिकेश कटकडे ने 4 ही बळी मिळवले आहेत.
23 वर्षाखालील मुलांच्या या स्पर्धेत नाणेफेक होत नसल्याने पहिल्या दिवशी सकाळी पाहुण्या रेल्वे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या जोडी दीपांशू व जयंत ने 103 चेंडूत नाबाद 50 धावा पूर्ण केल्या. महाराष्ट्राला पहिला बळी ऋषीकेश कटकडे ने दीपांशू चौधरी (38, 86 चेंडू 4 चौकार) साहिल पारख कडे झेल देण्यास भाग पाडत मिळवून दिला तो 25 व्या षटकात 83 धावावर, तोपर्यंत 5 गोलंदाजांनी षटके टाकली होती. पहिल्या सत्रात जेवणाला खेळ थांबे पर्यंत 29 षटकात 1 बाद 87 धावा केल्या होत्या.
दुसऱ्या सत्राच्या खेळात नाबाद जयंत कैवर्ट ने आपले अर्धशतक 6 चौकार, 1 षटकार लगावत 85 चेंडूत पूर्ण केले, पण 6 व्याच षटकात ऋषिकेश ने त्याला 50 धावावर कर्णधार किरण चोरमले द्वारे झेलबाद करत जोडी फोडली, 2 बाद 100.
त्यानंतर माधव धारवाडकर आणि अभिषेक कौशल यांनी प्रतिकार करत धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा ऋषिकेश ने माधव (14, 41 चेंडू, 1-1 चौकार,षटकार) याला पायचीत करत तिसरा बळी मिळवला. त्यानंतर आलेला कर्णधार विराट ने संयमी खेळी करत अभिषेक सोबत 41 धावांची भागीदारी रचली, आणि चहापानाला खेळ थांबला तेंव्हा 56 षटकात 3 बाद 155 अशी रेल्वेची धावसंख्या झालेली.
तिसऱ्या सत्रात पहिली 10 षटके झाली असताना ऋषिकेश ने अभिषेकला (29, 100 चेंडू, 2 चौकार) त्रिफळा बाद करत 68 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर आलेल्या यष्टिरक्षक सर्वेश रोहिल्ला ने मात्र अतिशय उपयुक्त फलंदाजी करत कर्णधाराला योग्य साथ देत धावफलक हलता ठेवला. कर्णधार विराट ने आपले अर्धशतक 87 चेंडू 9 चौकार मारत पूर्ण केले आणि दोघांनी 77 धावांची भागीदारी रचली व पहिल्या दिवसाच्या 90 षटकानंतर खेळ थांबला तेंव्हा विराट 81 (144 चेंडू, 11 चौकार) सर्वेश 37 (79 चेंडू, 6 चौकार) वर नाबाद आहेत.
महाराष्ट्र कडून 8 गोलंदाजांनी बळी मिळवायचा प्रयत्न केला परंतु केवळ ऋषिकेश ने 21 षटके टाकत 61 धावा देत 4 बळी मिळवले आहेत.
दुसऱ्या दिवशी उर्वरित 6 बळी लवकरात लवकर मिळवून उत्तम फलंदाजी करून सामना जिंकायचे प्रयत्न महाराष्ट्र संघ करणार आहे तो भक्कम फलंदाजीच्या जोरावर हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
————
सोबत फोटो :
जयंत कैवर्ट (रेल्वे) रंगीत टीशर्ट
विराट जैस्वाल (रेल्वे) पांढरा टीशर्ट
ऋषिकेश कटकडे (महाराष्ट्र)
Post Views: 10