वळसंग – दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग आणि चिंचोळी परिसरात शनिवारी झालेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.शेतकरी रमेश चिंचोळी व काशिनाथ माणकोजी यांच्या हातातोंडाशी आलेली केळीची बाग वादळामुळे पूर्णपणे उपटून पडली असून, त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.लाखो रुपयांचे नुकसान, घड मातीमोलमिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी माणकोजी यांनी कर्ज काढून आणि रात्रंदिवस मेहनत करून केळीची बाग जोपासली होती. बहुतांश झाडांना मोठे घड आले होते आणि काही दिवसांतच काढणी सुरू होणार होती. मात्र, काल सायंकाळी झालेल्या अचानक वादळी पावसामुळे केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर काही झाडे मधोमध तुटली आहेत. यामुळे संपूर्ण घड मातीत लोळत असून लागवडीचा खर्चही निघणे अशक्य झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी माणकोजी व चिंचोळी यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
प्रशासकीय दिरंगाई; पंचनाम्याची प्रतीक्षाघटना घडून २४ तास उलटत आले तरी अद्याप कृषी किंवा महसूल विभागाकडून या भागाची पाहणी झालेली नाही. वळसंग परिसरातील तलाठी समाधान काळे, मंडळ अधिकारी संतोष फुलारी आणि तहसीलदार किरण जमदाडे यांनी या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ बांधावर येऊन नुकसानीचे पंचनामे करावेत, तरच शेतकऱ्याला पीक विमा आणि शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
शेतकऱ्यांची आर्त हाक”बँकेचे कर्ज आणि उधारी घेऊन केळीची बाग उभी केली होती. डोळ्यांदेखत सर्व कष्ट मातीमोल झाले. आता कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंब कसे चालवायचे, हाच मोठा प्रश्न आहे. तहसीलदार किरण जमदाडे साहेबांनी तात्काळ पंचनाम्यांचे आदेश देऊन आम्हाला आर्थिक मदत मिळवून द्यावी,” अशी अश्रूभिजली प्रतिक्रिया पीडित शेतकरी माणकोजी व चिंचोळी यांनी दिली आहे.
Post Views: 33