बार्शी – शहरातील नागरिकांना भेडसावत असलेली पाणीटंचाई आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे. शहराचा नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर करण्यात येत असून संबंधित विभागाला तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बार्शी शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. यासाठी जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत सातत्याने समन्वय साधून कामाचा आढावा घेतला जात असल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.
लक्ष्याचीवाडी पंपगृहासह शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील विविध कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, आवश्यक निधी आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास कमी करुन नियमित पाणीपुरवठा सुरु करणे हेच प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार राऊत म्हणाले, “बार्शीकरांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी मी स्वतः या कामावर लक्ष ठेवून आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून, लवकरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”
दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा कायमस्वरुपी सक्षम करण्यासाठी विविध विकासकामांनाही गती देण्यात येत असून, आगामी काळात बार्शीकरांना अधिक सक्षम आणि नियमित पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा निर्धार आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 4