बार्शी – तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरु असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बार्शी तालुका पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या इसमावर छापा टाकून रुपये १०,३२५ किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पथक नियमित पेट्रोलिंग करीत असताना, बार्शी-जामगाव रोडवरील हॉटेल अश्विनी शेजारी एक इसम अवैधरित्या देशी-विदेशी दारुची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करुन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.
या कारवाईदरम्यान विजय अर्जुन आवटे (वय ५० वर्षे, रा. जामगाव, ता. बार्शी) हा कोणताही वैध परवाना नसताना देशी-विदेशी मद्याची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून विविध प्रकारच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण रुपये १०,३२५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.
सपोनी अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, पोलीस अमलदार सोमनाथ खांडेकर, सिंधुताई देशमुख, अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, गोविंद बचुटे व रोहित बागल यांनी सक्रिय सहभाग घेतला.