सोलापूर – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनात उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शिंदे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा आणि सोलापूरच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा गौरव केला. सामान्य कार्यकर्त्यापासून केंद्रीय गृहमंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या नेतृत्वाचा आणि मार्गदर्शनाचा काँग्रेस कार्यकर्त्यांना सातत्याने लाभ होत असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमास माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, माजी महापौर सुशीलाताई आबुटे, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, नगरसेवक प्रा. नरसिंह आसादे, हाजी मैनुद्दीन शेख यांच्यासह काँग्रेसचे विविध सेल व विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, भटक्या-विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष विवेक खन्ना, उत्तर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष अनंत म्हेत्रे, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, महिला पदाधिकाऱ्यांमध्ये माजी महिला अध्यक्ष ॲड. करीमुनिसा बागवान, हेमा चिंचोळकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान “सुशीलकुमार शिंदे साहेबांना उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो” अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे वाढदिवसाचा आनंद साजरा करत शिंदे यांच्याप्रती असलेला स्नेह व्यक्त केला.
चौकट
‘८५वा वाढदिवस, ८५ रक्तदाते’
माजी केंद्रीय गृहमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिंदे यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ८५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम शिंदे साहेबांना अनोखी सामाजिक भेट ठरला.
Post Views: 19