पंढरपूर – आषाढी यात्रे निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आलेल्या लाखो वैष्णवांनी एकादशीचा अनुपम्य सोहळा डोळेभरुन अनुभवत परंपरंने घराण्यातून चालत आलेली वारी पोहच केली. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल । ज्ञानदेव तुकाराम।। असा जयघोष करीत विठुरायाच्या भेटीला पुढच्या वर्षी येण्याची मनोमन इच्छा व्यक्त करुन मोठ्या जड अंतकरणाने वारकरी पंढरीचा आज निरोप घेत होते. येथील बस तसेच रेल्वे स्थानकावर पहाटे पासूनच भाविकांची परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी झालेली दिसत होती.
जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन झाले आता ।। या भावनेने येथील विठ्ठळ मंदिराच्या पश्चिमव्दारात तसेच महाव्दारात उभे राहून दोन्ही हातने स्वत:चे कान पकडून वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारीत सावळ्या परब्रम्हाकड़े क्षमा याचना करुन काही चुकले असेल तर माफी कर, पुढच्या वर्षी तुझ्या भेटीला येण्यासाठी बळ दे.. असे म्हणत त्याचा निरोप घेत होते. या वेळी एकीकडे वारी पोहचल्याचा आनंद तर दुसरीकडे निरोप घेताना झालेली त्यांची अवस्था त्यांच्या डोळ्या खालील पापण्याच्या ओलाव्या वरुन स्पष्ट जाणवत होती.
दरम्यान शनिवारी एकादशीच्या दिवशी रात्रभर शहरातील विविध मठ, धर्मशाळांमधून तसेच मंदिर परिसरातील गल्ली बोळातून असलेल्या मोठ्या वाड्यांमधून हरिजागर सुरु होता. मजल दरमजल करीत गेल्या वीस, बावीस दिवसांपासून पायी चालत आलेल्या भाविकांची विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची लांबच लांब रांग गेल्याचे दिसत होते. तरी देखील साऱ्या वेदना, सारी दु:खे नुसत्या विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाने विसरुन आनंदी होवून एकादशीची सर्व व्रतवैकल्ये पार पाडण्यात वारकरी व्यस्त असल्याचे दिसत होते.
त्या नंतर रविवारी व्दादशी दिवशी पहाटे पासूनच भाविकांची परतीच्या प्रवासासाठी लगबग दिसत होती. येथील चंद्रभागा वाळवंटा मध्ये भाविकांची एकादशी दिवशी मध्यरात्री पासूनच स्नानासाठी गर्दी झालेली होती. चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि नगरप्रदक्षिणा करुन व्दादशीच्या न्हाहरीची वारकऱ्यांची लगबग सुरु होती. अनेक मठ, धर्मशाळांमधून वारकऱ्यांच्या जेवणाच्या पंक्ती बसत असल्याचे दृश्य पहावयास मिळत होते.
वारकरी व्दादशी सोडून आपल्या बरोबर असलेल्या सामानाची बांधाबांध करुन मुक्कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडत थेट विठ्ठल मंदिराचे कळस दर्शन घेवुन रेल्वे, एस.टी तसेच खासगी वाहनांमधून बसुन बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल । ज्ञानदेव तुकाराम।। असा जयघोष करीत मोठ्या जडअंत:करणाने परतीच्या प्रवासासाठी आपआपल्या गावांकडे रवाना होत होते.
—————————————–
Post Views: 12