सोलापूर – वैद्यकीय साहित्य खरेदीच्या फाईलवरून लेखाधिकारी पाटील आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी नामदे यांच्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्या उपस्थितीतच इगो वरून मोठी खडाजंगी झाली अन् शाब्दिक चकमक उडाली. फाईल तपासणी आणि शेरा नोंदविण्याच्या प्रक्रियेवरून सुरू झालेला वाद काही काळ तीव्र झाला. तू कोण मला फाईल देणारा ? असे म्हणत पाटील यांनी कंत्राटी कर्मचाऱ्याची लायकी काढली. त्यानंतर नामदे यांनी देखील अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. पाटील यांच्या कार्याचा पाढा वाचला. या सर्व प्रकारात अधिकारी कर्मचारी यांच्यातील इगो नडला आणि अधिकारी कर्मचारी यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे चित्र दिसून आले. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कोपुरवाड यांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले. या भलत्याच प्रकरणानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड यांनी दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे दैनिक तरुण भारतशी बोलताना सांगितले.
औषधे, वैद्यकीय उपकरणे तसेच वारीसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीची प्रक्रिया रखडल्याच्या पार्श्वभूमीवर टेंडरच्या फाईलवरून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसमोरच लेखाधिकारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी नामदे यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादाने आरोग्य विभागातील अंतर्गत समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील खरेदी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडे तीन जिल्ह्यांच्या आरोग्य सेवा व्यवस्थेची जबाबदारी आहे. इतर विभागांनी आवश्यक कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्यास सुरुवात केली असताना, आरोग्य विभागातील कोट्यवधी रुपयांची औषध खरेदी आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष वारीच्या काळातील आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागात अनुभवी फार्मासिस्ट सेवानिवृत्त झाल्यानंतर खरेदी प्रक्रियेत आवश्यक अनुभवाचा अभाव असल्याने विविध निविदांमध्ये विलंब होत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. औषध खरेदी, वैद्यकीय उपकरणे तसेच वारीसाठी आवश्यक साहित्याच्या प्रक्रियेत समन्वयाचा अभाव जाणवत असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, वारीतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टोप्या व टी-शर्ट खरेदीसंदर्भातील फाईलही याच वादाचे कारण ठरल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या कर्मचाऱ्याकडे कोणत्या कामाची जबाबदारी असावी, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रशासकीय गोंधळ वाढत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोट
कडक कारवाईचे संकेत
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी नामदे यांनी, वरिष्ठांच्या सूचनेनुसारच संबंधित फाईल हाताळत असल्याचा दावा केला असून, आवश्यक शेरा घेण्यासाठी लेखाधिकारींकडे गेल्यानंतरच वाद निर्माण झाला. या संपूर्ण प्रकाराबाबत कडक भूमिका घेतली आहे. आरोग्य विभागात कोणीच व्यवस्थित नीटनेटकेपणाने कार्य करत नसल्याचे सांगताना जे कोणी अधिकारी कर्मचारी शिस्त पाळत नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे.
– डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
चौकट
समन्वय वाढविणे आवश्यक
आषाढी वारीसारख्या संवेदनशील काळात आरोग्य विभागातील अंतर्गत मतभेद आणि रखडलेली खरेदी प्रक्रिया यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. वेळेत निर्णय घेऊन खरेदी प्रक्रिया पूर्ण करणे, जबाबदाऱ्या स्पष्ट करणे आणि विभागातील समन्वय वाढविणे आवश्यक असल्याची अपेक्षा कर्मचारी आणि प्रशासनातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
चौकट
सीईओ कुशल जैन यांनी वेळेत सजग होणे गरजेचे
खरेदीचे सर्व काम फार्मसिस्ट सोळंकी पाहत होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रशासनाने अनुभवी कर्मचाऱ्यांची फाईल ठेवली पण अशातच विभागीय आयुक्तांकडून फार्मासिस्ट पुजारी यांनी नियुक्ती मिळवली. पण त्यांना कामाचा कोणताच अनुभव नसल्यामुळे गोंधळ वाढला आहे. याबाबत तक्रारी करून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे औषध व उपकरणे खरेदीचे अनेक कामे अडली आहेत. अशात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी कोणी दिली हा आता चर्चेचा विषय झाला आहे. जोपर्यंत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा संवेदनशील प्रकरणात गांभीर्याने पाहत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेची बदनामी सुरूच राहणार आहे. त्यामुळे सीईओ कुशल जैन यांनी वेळेत सजग होणे गरजेचे असल्याचे मत कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
चौकट
याची टोपी त्याच्या डोक्यावर ?
आषाढी यात्रा कालावधीत आरोग्य कर्मचाऱ्यांना टोप्या व टी-शर्ट खरेदी करण्याची ती फाईल होती अशी चर्चा आहे. या टेंडरची फाईल कंत्राटी कर्मचाऱ्याकडे कशाला असा लेखाधिकारी पाटील यांचा आरोप आहे. आरोग्य विभागात कोणाची टोपी कुणाला असा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. कोणती कामे कोणी करायची हे ठरलेले असतानाही विशिष्ट लाभाची कामे करण्यात व वरिष्ठांची सेवा केल्याचे दाखवून मेवा मारणारे कर्मचारी पुढे येत आहेत. त्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. आषाढी वारीत सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोप्या मिळणे दूरच राहिले, पण मुख्यालयात राहून अशाप्रकारे टोप्या घालण्याचा व्यवसाय वाढल्याची चर्चा आहे.