
सोलापूर – मार्डी गावातील मूलभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणाला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांनी विविध विकासकामांचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. घरकुल लाभार्थ्यांची बैठक, श्रीयमाई देवी मंदिर परिसरातील विकासकामांचे नियोजन आणि महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य वितरण अशा विविध कार्यक्रमांमुळे विकासाला नवे बळ मिळणार असल्याचे यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आयोजित घरकुल लाभार्थी आढावा बैठकीत पवार यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. पात्र लाभार्थ्यांना वेळेत आणि दर्जेदार घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शासनाच्या प्रत्येक लाभार्थीपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला.
यानंतर श्री क्षेत्र यमाई देवी मंदिर परिसराची पाहणी करून पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत ग्रामस्थांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाच्या पाण्याचा सुरक्षित निचरा, मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि सुमारे ४० लाख रुपयांच्या पेव्हर ब्लॉक कामाचे नियोजन याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. धार्मिक स्थळाचा विकास करताना भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, रुक्मिणीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक सहाय्याचे वितरण करण्यात आले. महिला उद्योजकता, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमतेसाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.यावेळी रंगनाथ गुरव, विनायक सुतार, आदींसह ग्रामस्थ, घरकुल लाभार्थी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
विकासकामांचा थोडक्यात आढावा
* प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी आढावा बैठक
* श्री यमाई देवी मंदिर परिसर विकासाचे नियोजन
* पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना
* सुमारे ₹४० लाखांच्या पेव्हर ब्लॉक कामाचा प्रस्ताव
* महिला बचत गटांना आर्थिक सहाय्याचे वितरण
* ग्रामस्थांशी संवादातून विकासकामांना गती देण्यावर भर
Post Views: 11