सोलापूर : विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांच्या वतीने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव – मातीचा गणपती तयार करण्याचा उपक्रम’ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य इस्माईल शेख सर यांनी मूर्तिकार मनाली जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सदर कार्यक्रम मूर्तिकार अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना मूर्तिकार मनाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती स्वतः तयार करण्याची संधी मिळाली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे, त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देणे, शाडू मातीच्या गणपती मूर्तीचे महत्त्व समजावून सांगणे तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. तसेच जलप्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्याचा संदेशही देण्यात येणार आहे.
‘मातीपासून मूर्ती… मूर्तीपासून संस्कृती… आणि संस्कृतीतून पर्यावरण संवर्धन!’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘परंपरेसोबत पर्यावरणाचीही काळजी घेऊया’ असा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते . हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पना जाधव, रमेश हेगडे, सना कुरेशी, गुलनाज शेख, अर्चना पोतदार प्रा.महेंद्र ढवाण व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक सचिव हाजी बंदेनवाज शेख यांनी कौतुक केले.
Post Views: 14